Gokul Election : 'गोकुळ'चा सस्पेन्स वाढला! दोन दिवसात कच्ची मतदार यादी की निवडणूक प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ? 

न्यायालयाने दिलेली ९० दिवसांची मुदत उद्या संपणार; सहकार क्षेत्रासह जिल्ह्याच्या राजकारणाचे निर्णयाकडे लक्ष
Kolhapur Gokul Dudh Sangh Election
Kolhapur Gokul Dudh Sangh ElectionPudhari
Published on
Updated on

आशिष ल.पाटील

गुडाळ : बहुचर्चित गोकुळ निवडणूक प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी संपत असून शासनाचा सहकार विभाग चार ऑगस्ट रोजी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करणार की सर्वोच्च न्यायालयातून निवडणूक प्रक्रियेला मुदतवाढ घेणार याकडे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, गोकुळच्या कट ऑफ डेट मधील शेकडो सभासद संस्थांच्या पात्रतेबाबत शासन आणि न्यायालयीन पातळीवर दावे -प्रतिदावे सुरू असल्याने ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही सहकार विभागाने कच्ची यादी अद्यापही प्रसिद्ध केलेली नाही. निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेला मतदार यादी कार्यक्रमच अपूर्ण असल्याने निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का याबद्दल साशंकता आहे.

पुंगाव ता.राधानगरी येथील स्वामी समर्थ दूध संस्थेने मे च्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन गोकुळ निवडणूक प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आदेश शासनाला देण्याबाबतची याचिका दाखल केली होती. सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ९० दिवसात गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. मात्र या आदेशात संधिग्धता असल्याचे कारण देत सहकार विभागाने तब्बल 25 दिवस या आदेशावर कार्यवाही केली नव्हती. त्यानंतर एक मे रोजी मतदार यादी कार्यक्रम सुरू करण्यात आला. मात्र पात्र -अपात्र संस्थांचा घोळ सुरूच राहिल्याने जुलै च्या पहिल्या आठवड्यात ठराव प्रक्रिया संपूनही ऑगस्ट उजाडला तरी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झालेली नाही.

या पाश्वभूमीवर स्वामी समर्थ दूध संस्थेने पुन्हा उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव घेतल्यानंतर 29 जुलै रोजी सर्किट बेंचने गोकुळची निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. तथापी डी.डी.आर.( दुग्ध), पुणे यांनी निवडणूक प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या परवानगीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येते. या याचिकेची अद्याप सुनावणी झालेली नाही. 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होऊन त्यावर निर्णय होणार की डी.डी.आर.( दुग्ध) हे कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करणार याकडे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news