Gokul Election | आ. शिवाजी पाटील महायुतीसोबत की, सतेज पाटलांच्या गळाला?

राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण : निर्णयाकडे लक्ष
Gokul Election |
Gokul Election | आ. शिवाजी पाटील महायुतीसोबत की, सतेज पाटलांच्या गळाला?
Published on
Updated on

प्रवीण आजगेकर

गडहिंग्लज :

गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन महिन्यांपासून सत्ताधारी नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गोकुळच्या कारभारावरून सातत्याने टीकास्त्र सोडत चंदगडचे आ. शिवाजी पाटील हे सध्या गोकुळच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. प्रशासक आणण्यासाठी प्रयत्नशील ठरलेल्या आ. पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यातच सन्मानकारक जागा दिल्या नाहीत तर आ. सतेज पाटील हे आम्हाला लांबचे नाहीत, असे वक्तव्य केल्याने आ. पाटील हे महायुतीसोबत जाणार की सतेज पाटील यांच्या गळाला लागणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

जिल्ह्यात गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचे प्राथमिक संकेत महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत हात उंचावून दिले आहेत. मात्र आ. शिवाजी पाटील यांनी गोकुळमधून मंत्री मुश्रीफ यांना बाजूला करणे, हे आपले ध्येय असल्याचे स्पष्ट केले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून आ. शिवाजी पाटील यांची ओळख आहे. एकीकडे त्यांनी मुख्यमंत्री देतील तो आदेश मानण्याची तयारी दर्शवली असली तरी सन्मानकारक जागा दिल्या नाही तर वेगळा विचार करू, असेही वक्तव्य केल्याने नेमके आ. पाटील यांच्या मनात काय चालले, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

आ. पाटील यांनी भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना गोकुळसाठी जास्तीत जास्त ठराव गोळा करा. गडहिंग्लज उपविभागासाठी किमान पाच जागा व पाच वर्षांत एकदा तरी अध्यक्षपद मिळायला हवे, अशी मागणी केली. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महायुतीला रामराम ठोकून विरोधी सतेज पाटील यांच्यासोबत जाण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे नेमके आ. पाटील यांचे हे दबावतंत्र आहे की, प्रत्यक्षात ते ही भूमिका घेऊ शकतात, याबाबत चर्चांना ऊत आला आहे.

दबावतंत्र की विरोधच?

भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे आरोप करताना आ. शिवाजी पाटील यांनी गोकुळमधून मंत्री हसन मुश्रीफ यांना बाहेर ठेवण्याबाबतचे वक्तव्य केले होते. महायुतीमधून लढण्यावर चर्चा झाली असताना आ. पाटील यांनी वेगळ्या मागण्या ठेवत मागण्या मान्य न केल्यास विरोधकांसोबत जाण्याचेही जाहीर केले. त्यामुळे आ. पाटील यांचे हे दबावतंत्र आहे की मुश्रीफांना विरोध कायम आहे, हे आगामी काळात ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news