

धीरज बरगे
कोल्हापूर : गोकुळची निवडणूक मुदतीत होणार का लांबणीवर पडणार, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. महायुतीतील एक नेते निवडणूक लांबणीवर टाकून विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरे नेते निवडणूक मुदतीत घेण्याच्या भूमिकेत आहेत. आठवडाभरात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीत काय निर्णय होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत मे 2026 मध्ये संपत आहे. त्यामुळे निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत; मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे अ व ब वर्ग सहकारी संस्थांच्या निवडणुकीला दिलेली स्थगिती अद्याप उठविलेली नाही. परिणामी, गोकुळची निवडणूक मुदतीत होणार का नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
निवडणूक घेण्याबाबत आदेश मिळाल्यानंतर दुग्ध विभाग मतदानास पात्र संस्थांची मतदार यादी मागविणे, कच्ची यादी प्रसिद्ध करणे, हरकती मागविणे, सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या सर्व प्रक्रियेला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. फेब—ुवारीअखेर स्थगिती उठणे आवश्यक आहे. निवडणूक मे महिन्यापर्यंत झाली नाही, तर पुढे पावसाळ्यामुळे ऑक्टोबर अखरेपर्यंत निवडणुका होणार नाहीत. यानंतर प्रक्रिया सुरू झाल्यास वर्षाखेरीस अथवा जानेवारी 2027 मध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
सहकारमंत्र्यांच्या सूचनेनंतर निवडणूक
सहकार विभागाने स्थगिती उठविण्यासाठी निवडणूक प्राधिकरणाला पत्र दिले आहे; मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. महायुतीचे नेते सहकारमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतरच स्थगिती उठणार अशी चर्चा आहे.