Gokul dairy | सहायक निबंधक-संस्थाचालकांत खडाजंगी

‘गोकुळ’ दूध संस्था सुनावणीवरून वाद; वातावरण तणावपूर्ण
Gokul dairy |
Gokul dairy | सहायक निबंधक-संस्थाचालकांत खडाजंगी
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सुनावणी व निकाल देण्यावरून सहायक निबंधक व दूध संस्थाचालक यांच्यामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली. सुनावणी प्रक्रियेवरून सभासदांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. यामधून वादावादी झाली. तसेच, नोकर भरतीसाठी 30-30 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करत यासंदर्भातील माहिती देण्याची मागणी प्रशासक मंडळाकडे काही संस्थाचालकांनी केली. यामुळे दुपारपर्यंत सहायक निबंधक आणि ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण होते.

अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांनी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सभासदांनी सुनावणी प्रक्रिया सावकाश सुरू आहे. अधिकारी जागेवर नसतात. सुनावणी झालेल्या दूध संस्थांचे निकाल कधी देणार, त्या 212 दूध संस्था बाजूला का ठेवल्या, त्यांना सुनावणीची नोटीस का पाठविली नाही, अशा प्रश्नांचा भडिमार ठाकरे यांच्यावर केला. ठाकरे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार काम सुरू असून, 80 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करू, असे सांगितले.

यावर सभासद आक्रमक झाले. सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांना निकाल देण्यात काय अडचण आहे, अशी विचारणा केली. ठाकरे यांनी शाहूपुरी पोलिसांना फोन लावा, असे कर्मचार्‍याला सांगितले. यावरून सभासद अधिकच संतप्त झाले अन् वादावादीला सुरुवात झाली. अखेर सुनावणी प्रक्रियेची लेखी माहिती घेतल्यानंतर संस्था सभासद कार्यालयातून बाहेर पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news