

कोल्हापूर : विशेष समितीने चौकशी केलेल्या गोकुळ दूध संघाच्या ४२७ संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी सोमवारी दिला व तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही दिले. वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांच्या तक्रारीवरून विभागीय उपनिबंधक यांनी विशेष चौकशी समितीला संस्था तपासणीचे आदेश दिले होते. सभासदत्व रद्द करण्यात येणार्या ४२७ पैकी १५८ संस्था अवसायनात गेल्या; तर उर्वरित २६९ संस्थाही यादीतून कमी होणार आहेत. चौकशीच्या आदेशास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. तरीही प्रारूप मतदार यादी तयार होत असताना चौकशी पूर्ण करून अहवाल सादर झाला. हा एकतर्फी आदेश असून या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे खेबवडे येथील सुयोग वाडकर यांनी सांगितले.
महायुतीचे २२८९ ठराव दाखल
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी सोमवार शक्तिप्रदर्शनाचा वार ठरला. भाजप, शिवसेना, जनसुराज्य, राष्ट्रवादीने ईर्ष्येने दिवसभरात २२८९ ठराव सहायक निबंधक दुग्ध कार्यालयात दाखल केले. आजअखेर ४६५० संस्थांनी ठराव सादर केले आहेत. बुधवारी (दि. १) ठराव सादर करण्याची अंतिम मुदत आहे. मंगळवारी काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. सध्या प्रक्रिया अंतिम टप्प्प्यात असल्याने सहायक निबंधक कार्यालयात ठराव दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. तीन पक्षांनी शक्तिप्रदर्शन करत तर राष्ट्रवादीनेही १०१ ठराव दाखल केल्याने येथे प्रचंड गर्दी होती.
आ. चंद्रदीप नरके, माजी खा. संजय मंडलिक, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनीही ठराव सादर केले. दिवसभरात सर्वाधिक ठराव करवीर ५२२ आणि पन्हाळा तालुक्यातून ४३३ ठराव दाखल झाले. सोमवारी आजरा ७४, कागल २६१, गगनबावडा ४२, गडहिंग्लज ८०, चंदगड १२२, भुदरगड २४९, राधानगरी १०९, शाहूवाडी २५४, शिरोळ ६० आणि हातकणंगलेमधून ८३ ठराव दाखल झाले. काँग्रेसकडून ठराव दाखल करणे बाकी आहे. त्यामुळे पात्र संस्थांच्या संख्येपेक्षा दाखल ठरावांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.