Gokul Dairy | गोकुळ : ‘त्या’ 1,490 दूध संस्थांचे ठराव सशर्त घेणार

सहायक निबंधक (दुग्ध) ठाकरे यांचा निर्णय; आजअखेर 1,050 संस्थांनाच ठरावाच्या प्रती
Gokul Dairy
गोकुळ दूध संघPudhari File Photo
Published on
Updated on

आशिष ल. पाटील

गुडाळ : ‘गोकुळ’साठी अवसायनातील 1,225 आणि पोटनियमाचा भंग होऊन सभासद झाल्याचा ठपका असलेल्या संस्थांमध्ये समावेश असलेल्या 1,490 दूध संस्थांना (काही संस्था दुहेरी कारवाईत) अंतिम टप्प्यात सशर्त ठरावाच्या प्रती पाठविण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांनी घेतला आहे.

‘गोकुळ’च्या ‘कट ऑफ डेट’मधील 5,470 सभासद संस्थांना ठरावाच्या प्रती पाठविण्यास 26 मे रोजी सुरुवात झाली असली, तरी गुरुवारअखेर अवघ्या 1,050 संस्थांनाच ठरावाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. उर्वरित तीन दिवसांत 4,420 प्रती पाठविण्याचे आव्हान कार्यालयासमोर आहे.

नोंदणी झाल्यावर नोंदणीनंतर किमान 90 दिवस ‘गोकुळ’ला दूधपुरवठा केल्यानंतरच त्या संस्थेला सभासदत्व द्यावे, असा ‘गोकुळ’चा पोटनियम आहे. मात्र, अनेक दूध संस्थांना या पोटनियमाचे उल्लंघन करून ‘गोकुळ’चे सभासदत्व दिल्याचा आरोप ‘गर्जना’च्या प्रकाश बेलवाडे यांनी करत शासनाकडे या संस्थांच्या चौकशीची मागणी केली होती. शासनाने चौकशी समिती नेमून या आरोपाची पडताळणी केली असता, नोंदणीनंतर 90 दिवसांच्या आत संचालक बैठकीत सभासदत्व दिलेल्या 423 संस्था आढळून आल्या आहेत.

ठराव पाठविण्याची प्रक्रिया संथगतीने?

यापूर्वीच्या ‘गोकुळ’ निवडणुकीत सहायक निबंधक किंवा उपनिबंधक ठरावासोबतच्या कव्हरिंग लेटरवर सही करून त्याच्या छायांकित प्रती प्रत्येक ठरावासोबत पाठवत असत. त्यामुळे डिस्पॅचचे काम जलदगतीने होई. यावेळी प्रत्येक पत्रावर सही करण्याचा आणि ‘गोकुळ’ कर्मचार्‍यांनी तयार केलेली दररोज ठराव पाठविण्याची यादी आपल्या यंत्रणेमार्फत पुन्हा चेक करण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी घेतला आहे. तसेच, प्रत्येक तालुक्यातील 1,490 मधील ‘त्या’ यादीत समावेश असलेल्या संस्थांचे ठराव वेगळे करण्यात येत आहेत. त्यामुळेच ठराव पाठविण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news