

कोल्हापूर : राजकीय नेत्यांच्या हातात चार हजार कोटी रुपयांच्या ‘गोकुळ’ दूध संघाची सूत्रे असूनही संघ राजकारणविरहित होता. मात्र, आता नेत्यांनी केलेल्या सोयीच्या आघाडीला राज्यातील नेत्यांनी ‘ब्रेक’ लावला आहे. सोयीच्या भूमिका घेऊन सहकारात राजकारण नसते म्हणणार्या नेत्यांचा कासरा महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी चांगलाच ओढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी निर्णयाचे स्वातंत्र्यच गमावले आहे. यापुढे ‘गोकुळ’ची निवडणूक पक्षीय पातळीवर होईल. महाडिकांना हटवून सत्तांतर करणारी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी यामुळे फुटली आहे.
जिल्ह्यातील नेत्यांची अवस्था आता ज्यांच्याशी उभा दावा मांडला त्यांच्याबरोबर संसार करावा लागणार, अशी झाली आहे. महाडिक विरोधाची भूमिका घेऊन एकत्र आलेल्या नेत्यांची आघाडी फुटली. आता नव्या महायुतीत महाडिक यांच्याशी जमवून घ्यावे लागणार आहे.
जिल्ह्यातील नेत्यांनी महाडिकांची सर्व संस्थांवरील सत्ता संपुष्टात आणण्यासाठी जंगजंग पछाडले. कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती, जिल्हा बँक येथील राजकारणाच्या नाड्या महाडिक विरोधकांनी आपल्या हाती घेतल्या. मात्र, ‘गोकुळ’ गडाला सुरुंग लावण्यास त्यांना यश आले नाही. प्रत्येकवेळी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा नेता महाडिक यांच्या बाजूने उभा राहिला आणि त्याच्या आधारावर महाडिकही भक्कमपणे उभारले. कधी पी. एन. पाटील असतील, तर कधी सदाशिवराव मंडलिक असतील. ते उभारले म्हणूनच महाडिक विरोधकांवर मात करू शकले, हेही तेवढेच सत्य आहे.
अखेर या सर्व नेत्यांना ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडविण्यात 2021 मध्ये यश आले. सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील आदींनी यामध्ये प्रमुख भूमिका बजावली. या प्रत्येक नेत्याचे पक्ष वेगळे असले, तरी सहकारात राजकारण नाही, अशा सोयीच्या भूमिकेतून ते एकत्र आले आणि सत्तांतर घडविले. यामध्ये ठरावाच्या रूपाने सर्वात मोठा वाटा उचलला तो विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी.
मात्र, चौथ्या वर्षी अध्यक्षपदाची मुदत पूर्ण होत असताना अरुण डोंगळे यांनी अचानकपणे महायुतीचा नारा सुरू केला. त्यापूर्वीच त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीशी फारकत घेऊन शिवसेना शिंदे गटाचा प्रचार केला. अध्यक्षपदाचा राजीनामा देता देता त्यांनी महायुतीचा जयघोष सुरू केला आणि सगळेच बुचकळ्यात पडले. डोंगळे म्हणाले त्याप्रमाणे ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडले खरे; पण डोंगळेेंचा बोलविता धनी कोण? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद यांच्या गळ्यात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ पडली. हे काही अचानकपणे घडलेले नाही. डोंगळे यांची मागणी आणि नविद यांचे अध्यक्षपद हे एका सूत्रात बांधल्यासारखे वाटते.
आता या संचालक मंडळाचे शेवटचे वर्ष असून, पुढील वर्षी संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गोकुळ’चे संचालक भेटायला गेले. तेव्हा त्यांनी महायुती म्हणूनच ‘गोकुळ’मध्ये सत्ता स्थापन करा, असे सुस्पष्ट आदेश दिल्यामुळे नेत्यांना आता हालचाल करता येणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगला कारभार करा, असा आदेश देत ‘गोकुळ’च्या कारभारावर आपण समाधानी नसल्याचेच एकप्रकारे दाखवून दिले आहे.
हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, विनय कोरे, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सारे महायुतीचे नेते आहेत. ज्यांच्याविरोधात त्यांनी दंड थोपटले होते त्या महाडिक गटाबरोबर त्यांना येणारी निवडणूक लढवावी लागणार आहे, तर या महायुतीविरोधात सतेज पाटील यांना मिळेल ती शिबंदी घेऊन लढावे लागेल. अरुण डोंगळे हे महायुतीच्या बाजूला असतील हे स्पष्ट आहे. मात्र, विश्वास पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे.
या वर्षअखेर ‘गोकुळ’च्या मतदारयादीत नाव नोंदणी करण्यासाठी ठराव देण्याची प्रक्रिया सुरू होईल. तेथेच ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. कोणाकडे जास्त ठराव त्याची सत्ता हे स्पष्ट आहे. विद्यमान संचालक मंडळात उभी फूट पडल्याने ठरावधारक मतदारांची पळवापळवी होणार, हे उघड आहे. संचालक मंडळाच्या फुटीमुळे ‘गोकुळ’च्या माजी संचालकांनाही कमालीचे महत्त्व आले आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. महायुतीकडे बहुतांश नेते असल्याने पॅनेलची रचना करताना व सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात त्यांची कसोटी लागणार आहे.
दूध संस्थांची संख्या वाढली असून, यातूनच आता ठरावाच्या माध्यमातून मतदारयादी तयार केली जाणार आहे. राधानगरीमध्ये सर्वाधिक 245, कागलमधून 239 संस्था नव्याने नोंदल्या गेल्या आहेत. त्यापाठोपाठ करवीरमध्ये 227, भुदरगडमध्ये 224 संस्था नोंदल्या गेल्या आहेत. या चारही तालुक्यांचे नेतृत्व हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्रकाश आबिटकर करीत आहेत.