

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. चंद्रदीप नरके यांनी रविवारी टोलेबाजी केली. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे त्यांचे त्यांचे संसार सुखाने चालले आहेत. त्यामुळे त्याच्याबाबत चर्चा किंवा वादविवाद निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असे सांगत मंत्री मुश्रीफ यांच्याकडे पाहत सहा वेळा आमदार आणि नऊ वेळा आपण मंत्री होता. आपली जरा कुंडली बघायलाच पाहिजे, असे आ. चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
आता तुम्हाला खासदारकीला उभे राहावे लागेल, असे म्हणताच खासदार शाहू महाराज त्यांच्याकडे पाहून हसले. यावर नरके यांनी तुम्हाला काही धोका नाही. कारण, कोल्हापूरचे आता तीन लोकसभा मतदारसंघ होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. विनय कोरे यांच्या अनुपस्थितीबाबत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. याचा संदर्भ देत आ. नरके म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहेत. गोकुळमध्ये मंत्री मुश्रीफ, आ. सतेज पाटील नेतृत्व करत आहेत. मंत्री मुश्रीफ, तर सहा वेळा आमदार आणि नऊवेळा मंत्री झाले आहेत. आता आणखी एकवेळ निवडणूक लढविणार. त्यानंतर लोकसभा लढवणार आहेत ते. यावेळी शाहू महाराज त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा आ. नरके शाहू महाराज यांच्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण, कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक लाकसभेचा मतदारसंघ वाढणार आहे.
मंत्री मुश्रीफ यांच्या कुंडलीचा विषय नरके यांनी काढला तेव्हा खासदार शाहू महाराज मुश्रीफ यांच्या कानात काही तरी बोलले. काय बोलले ते समजले नाही; परंतु व्यासपीठावरील मात्र सर्वजण हसत होते. त्यामुळे शाहू महाराज काय बोलले, याची चर्चा सुरू होती.
मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस रामनवमीदिवशी आणि आ. सतेज पाटील यांचा वाढदिवस हनुमान जयंतीदिवशी आहे. त्यामुळे या राम-हनुमान जोडीने पुढच्या वर्षीही एकत्र राहून आम्हाला मार्गदर्शन करावे, असे डोंगळे म्हणाले. गोकुळची पुढच्या वर्षी निवडणूक होत असून या पार्श्वभूमीवर गोकुळचे अध्यक्ष डोंगळे यांनी केलेले वक्तव्य गोकुळच्या आगामी निवडणुकीची दिशा दाखविणारे असल्याचे बोलले जात आहे.