Gokul Election 2026 | संघर्षात घाम गाळणाऱ्यांना संधी की काठावरील इच्छुकांचीच वर्णी?

१,७४० संस्थांच्या अपात्रतेच्या लढाईवरून राजकीय वातावरण तापले
Gokul Election 2026 |
Gokul Election 2026 | संघर्षात घाम गाळणाऱ्यांना संधी की काठावरील इच्छुकांचीच वर्णी?
Published on
Updated on

डॅनियल काळे

कोल्हापूर : गावोगावच्या दूध संस्थांचे अस्तित्व टिकविण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे, आंदोलने करणारे आणि प्रत्यक्ष जनावरांची शाण-घाण काढून दूध उत्पादन वाढविण्यासाठी झटणारे खरे दूध उत्पादक एका बाजूला, तर या संपूर्ण संघर्षापासून सुरक्षित अंतर ठेवून संचालकपदावर डोळा ठेवणारे दुसऱ्या बाजूला, असे चित्र गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आले आहे. त्यामुळे संस्थांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या सामान्य दूध संस्था प्रतिनिधींना संचालकपदाची संधी मिळणार की, कातडी बचाव धोरण अवलंबणाऱ्यांचीच वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे. महायुती असो अथवा महाविकास आघाडी, दोन्ही आघाड्यांतील कार्यकर्त्यांमध्ये याबाबतची चर्चा सुरू आहे.

गोकुळची पंचवार्षिक निवडणूक निर्णायक वळणावर आली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक वेगळी ठरणार असून, प्राथमिक सभासद असलेल्या गावोगावच्या दूध संस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्नच निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत होण्याची शक्यता असल्याने अपात्र संस्थांचा मुद्दा दोन्ही आघाड्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. संचालकपदावर डोळा ठेउन सोयीचे असेल तर महायुती किंवा महाविकास आघाडी आणि गैरसोय वाटत असेल तर सहकारात राजकारण नसते, असा राजकीय समज असल्याचा आव काही जणांनी आणला आहे.

१,७४० संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार

गोकुळच्या एकूण ५,४७० प्राथमिक सभासद दूध संस्था असून, त्यापैकी १,७४० संस्थांवर अपात्रतेची कारवाई सुरू आहे. हे प्रमाण सुमारे ३५ टक्के आहे. त्यामुळे या संस्थांचे भवितव्य निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारे ठरू शकते.

अपात्रतेच्या कारवाईविरोधात अनेक संस्था प्रतिनिधींनी स्वतःच्या पातळीवर लढा उभा केला. शासननियुक्त प्रशासकीय मंडळाला जाब विचारण्यापासून सुरू झालेला हा संघर्ष सहायक निबंधक (दुग्ध), विभागीय सहकार उपनिबंधक, पुणे, सहनिबंधक, वरळी-मुंबई, सहकार न्यायालय, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. घेराव, निवेदने, मोर्चे आणि न्यायालयीन लढाई अशा विविध माध्यमांतून हा संघर्ष सुरू राहिला. संस्थांच्या पात्रतेसाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या प्रतिनिधींना किमान दोन-तीन उमेदवारी देऊन त्यांच्या संघर्षाचा सन्मान केला जाणार का? की संघर्षापासून दूर राहून केवळ संचालकपदावर डोळा ठेवणाऱ्यांचीच वर्णी लागणार? गोकुळच्या निवडणुकीत कोण खऱ्या दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहते आणि कोण कातडी बचावते, याची कसोटी लागणार आहे.

नेत्यांची कसोटी लागणार

गोकुळची खरी ताकद गावागावच्या दूध उत्पादकांच्या घामात आहे. पहाटेपासून जनावरांची शाण-घाण काढून, चारा-पाणी देत दूध उत्पादन वाढविणाऱ्या उत्पादकांचा या संघात मोलाचा वाटा आहे; मात्र संस्थांच्या अस्तित्वासाठी लढा सुरू असताना सुरक्षित अंतर ठेवणारे काहीजण आता संचालकपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. निवड करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news