Gokul Election | ‘गोकुळ’मध्‍ये कोणाला संधी, कोणाचा पत्ता होणार कट?

जिल्‍ह्यात रंगली संभाव्‍य उमेदवारांची चर्चा
Gokul Election |
Gokul Election | ‘गोकुळ’मध्‍ये कोणाला संधी, कोणाचा पत्ता होणार कट?
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, ‘गोकुळ’मध्‍ये महायुतीमधून कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत राजकीय तर्कवितर्क व्‍यक्‍त केले जात आहेत. संभाव्‍य उमेदवारांची चर्चा आता गावागावांत रंगू लागली आहे. राखीव जागांचे सूत्र जवळपास स्‍पष्‍ट झाले आहे. सर्वसाधारण गटातच उमेदवारीवरून रस्‍सीखेच होणार, असे चित्र आहे.

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाचे सूत्र स्‍पष्‍ट केल्‍याने घटक पक्षांना दिलेल्‍या जागांमध्‍ये स्‍थानिक नेत्‍यांना उमेदवार निश्‍चित करावे लागणार आहेत. राष्‍ट्रवादीला ९ आणि स्‍वीकृतची एक अशा १० जागा मिळाल्‍या आहेत. यामध्‍ये नविद मुश्रीफ, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, किसन चौगले, युवराज पाटील, वसंत ऊर्फ बाळासो खाडे हे मागील सहा संचालक मंडळात संचालक होते, तर माजी आ. राजेश पाटील, तेजस्‍विनी पाटील, सतीश पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. तर अजूनही काही इच्‍छुक आहेत. त्‍यामुळे उमेदवार निश्‍चित करताना मंत्री मुश्रीफ यांचा कस लागणार आहे.

शिवसेनेला स्वीकृतसह आठ जागा

शिवसेनेला स्वीकृतसह आठ जागा मिळाल्‍या आहेत. यामध्‍ये विश्‍वास पाटील, अजित नरके, संभाजी पाटील, नंदकुमार ढेंगे, डॉ. सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव हे सहा माजी संचालक आहेत. मात्र, शिवसेनेत माजी संचालकांमध्‍ये काही चेहरे बदलले जाण्‍याची दाट शक्‍यता आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्‍याकडून नवे चेहरे दिले जाणार, अशी चर्चा आहे. तर अनुसूचितची जागा आ. चंद्रदीप नरके करवीरमध्‍ये घेणार का, याकडे लक्ष असणार आहे. तर वीरेंद्र मंडलिक यांची उमेदवारी निश्‍चित आहे.

भाजपमध्‍ये पाच नवे चेहरे

भाजपच्‍या वाटणीलाही स्वीकृतसह आठ जागा आल्‍या आहेत. यामध्‍ये शौमिका महाडिक, अंबरिष घाटगे, डॉ. चेतन नरके हे माजी संचालक आहेत. तर भटके विमुक्‍तमधून माजी संचालक विश्‍वास जाधव यांचे नाव चर्चेत आहे. त्‍याचबरोबर नाथाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, रामचंद्र भोगम, रघुनाथ पाटील, अशोक चराटी अशी अनेक नावे चर्चेत आहेत. यामधून पाच नवे चेहरे भाजपमधून दिले जाणार आहेत.

जनसुराज्‍यचे उमेदवार फिक्‍स

जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाला दोन जागा मिळाल्‍या आहेत. यामध्‍ये पन्‍हाळा तालुक्‍यातून अमरसिंह पाटील, शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड यांची उमेदवारी फिक्‍स असल्‍याची चर्चा आहे. मात्र, आ. अशोकराव माने यांनी अनुसूचित जातीमधून अर्ज भरला आहे. त्‍यामुळे जनसुराज्‍यमध्‍ये उमेदवार बदलणार का मागील संचालकांनाच पुन्‍हा आ. विनय कोरे संधी देणार याकडे लक्ष असणार आहे.

काँग्रेसचे चार जागांवर लक्ष

काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्‍या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे २१ उमेदवार निश्‍चित असल्‍याची चर्चा आहे. यामध्‍ये बाबासो चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, प्रकाश पाटील या सहा माजी संचालकांची उमेदवारी निश्‍चित आहे. तर अन्‍य १५ उमेदवारही ठरले आहेत. चार जागा प्रलंबित ठेवल्‍या आहेत. महायुतीमधील काही नाराज गळाला लागले, तर त्‍यांना तिथे संधी दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news