

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध होणार का, अशी चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रांत सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश नेते महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आहेत. त्यामुळे बिनविरोधसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सद्यस्थितीत बिनविरोधच्या कोणत्याही हालचाली नसल्या, तरी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच याबाबत स्पष्टोक्ती येण्याची शक्यता आहे.
जयसिंगपूर पालिकेचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी वाढीव चार जागा आ. सतेज पाटील यांना दिल्या तर ‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध होणार, असा ठाम विश्वास गुरुवारी राष्ट्रवादीच्या शक्तिप्रदर्शनादरम्यान व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर बिनविरोधची चर्चा रंगली आहे.
महायुतीच्या नेत्यांनी ‘गोकुळ’ची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहे. घटक पक्षांमध्ये मतभेद असले, तरी वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद दबला आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेते महायुती म्हणून एकत्र असल्याने ‘गोकुळ’ निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येईल, असा अंदाज आहे. मात्र, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी केली आहे. जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणूक लढणार आहेत. समविचारीची संपूर्ण भिस्त ही आ. पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ बिनविरोध करायचे झाल्यास त्यासाठी आ. पाटील यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
वारणेच्या नेत्यांना घ्यावा लागणार पुढाकार
‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वारणेच्या नेत्यांनी यापूर्वीच पुढाकार घेतला होता. त्यांनी प्रस्ताव आ. पाटील यांना दिला होता. प्रस्तावावर आ. पाटील विचार करणार होते. तोच तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने निवडणूक लांबणीवर पडली अन् प्रस्ताव बारगळला. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असल्याने बिनविरोधसाठी पुन्हा वारणेच्या नेत्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.