

धीरज बरगे
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत ठरावांच्या संख्येनुसार जागा वाटपाचा ठरलेला फॉर्म्युला आता बारगळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळसाठी पक्षनिहाय जागा वाटप होईल, असे स्पष्ट केले असल्याचे समजते. तसेच महायुतीचे संपूर्ण पॅनेल निवडून आणण्याची जबाबदारी प्रामुख्याने जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यावर सोपवली असून एक़ाही जागेला धक्का बसता कामा नये, अशी सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील महायुती नेत्यांना केल्याचे समजते.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल केले जात असताना दुसरीकडे महायुतीत जागा वाटपावरून खलबते सुरू आहेत. गोकुळच्या महायुतीमधील जागा वाटपाचा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला असून तिथेच जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे. काही दिवसांपूर्वी गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत गोकुळमधील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर काही दिवसांतच मंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झाल्याने जागा वाटपावरून जोरदार खलबते सुरू असल्याची चर्चा आहे.
महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा?
महायुतीमध्ये सर्वाधिक ठराव राष्ट्रवादीकडे तर दोन नंबरची ठराव संख्या शिवसेनेकडे असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ठराव संख्येनुसार जागा वाटप होणार नसल्याचे समजते. महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची चर्चा आहे.
दूध संस्थांच्या मेळाव्यानंतर बदलली रणनीती
१४०० दूध संस्थांनी सत्यविजय मेळावा घेत गोकुळ निवडणुकीत थेट अदृश्य शक्तीलाच आव्हान दिले. दूध संस्थांच्या या भूमिकेनंतर गोकुळ निवडणुकीची रणनीतीच बदलली गेली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोकुळ निवडणुकीत महायुतीचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले पाहिजे, याची जबाबदारी जिल्ह्यातील एक मंत्री यांच्याकडे दिली आहे. तसेच नाराजीचे कारण चालणार नाही, अशीही सूचनाही केल्याचे समजते.
मोठा भाऊ कोण, लहान भाऊ कोण?
जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसफूस सुरूच आहे. भाजप मोठा भाऊ आहे, असे भाजपचे खा. धनंजय महाडिक सांगत असताना राज्यातील सत्तेत भाजप मोठा भाऊ आहे; मात्र गोकुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ, असे राष्ट्रवादीचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ठामपणे सांगत आहेत. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू झाली आहे. आता जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या सभासदांसह जिल्ह्याचेही जागावाटप कसे होणार आणि कोण मोठा भाऊ होणार, कोण छोटा भाऊ ठरणार, याकडे लक्ष लागले आहे.