गोकुळ निवडणूक; सहकारात पक्षीय राजकारणाची एंट्री?

महायुतीच्या माध्यमातून प्रथमच पक्षीय पातळीवर हालचाली
गोकुळ निवडणूक; सहकारात पक्षीय राजकारणाची एंट्री?
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या निमित्ताने सहकारात पक्षीय राजकारणाची एंट्री होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सहकारात गोकुळच्या माध्यमातून प्रथमच पक्षीय पातळीवर निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. गोकुळमधील सत्ताधारी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. पक्षीय राजकारणामुळे सहकारात नेत्यांकडून होणार्‍या सोयीच्या राजकारणाला बगल मिळणार आहे.

पक्षीय राजकारण वेगळे आणि सहकारातील राजकारण वेगळे, अशी भूमिका घेत जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समिती, शेतकरी संघ अशा महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आजपर्यंत सोयीस्कर आघाड्या केल्या. गोकुळमध्येही मागील निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना हाताशी धरून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लावला. याचा वचपा अप्रत्यक्षरीत्या शेवटच्या वर्षभराच्या कालावधीसाठी होणार्‍या चेअरमन निवडीत काढला. काँग्रेसचा चेअरमन न करता चेअरमन महायुतीचा झाला पाहिजे, अशी भूमिका घेत मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नविद मुश्रीफ यांना गोकुळचे चेअरमन केले. तेव्हापासून गोकुळमधील महायुतीच्या राजकारणाला सुरुवात झाली.

जिल्ह्यातील महायुतीचे नेते आताही गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार म्हणत असले, तरी यामागे आमदार सतेज पाटील यांना गोकुळच्या सत्तेपासून दूर ठेवण्याची भाजपची राजकीय खेळी आहे; मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर महायुतीमध्येच अंतर्गत वाद सुरू झाला आणि गोकुळमधील संघर्षाला वेगळे वळण मिळाले. त्याचे पडसाद आता मुंबईपर्यंत पोहोचले असून, मुख्यमंत्र्यांसमोर हा वाद मिटणार का, हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

गोकुळमधील पाटील- महाडिक वाद बाजूलाच

गोकुळमधील सत्तेवरून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला. महाडिकांच्या कित्येक वर्षाच्या सत्तेला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी सुरुंग लावला. त्यानंतर गेली चार वर्षे गोकुळमध्ये पाटील-महाडिक गटातील संघर्ष बघायला मिळाला; मात्र सध्या गोकुळमध्ये पाटील-महाडिक गटाचा वाद बाजूलाच पडला आहे. मंत्री मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे.

साम, दाम, दंड, भेदचा वापर

गोकुळमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकारणात अद़ृश्य शक्ती चर्चेत आली. महायुतीमधील वादात सध्या आमदार शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे हे पुढे असले, तरी त्यांच्या मागेही एक शक्ती असल्याची चर्चा आहे. अधिकार्‍यांच्या बदल्या, चौकशी अहवाल यामधून या शक्तीकडून गोकुळमध्ये सध्या साम, दाम, दंड, भेदचा वापर सुरू असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news