Gokul Election | राष्‍ट्रवादी १०, भाजप, शिवसेनेकडून प्रत्‍येकी आठ जागांची मागणी

Gokul Election |
Gokul Election | राष्‍ट्रवादी १०, भाजप, शिवसेनेकडून प्रत्‍येकी आठ जागांची मागणी
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळसंदर्भात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्‍या बैठकीत राष्‍ट्रवादीने १०, भाजप-शिवसेनेने प्रत्‍येकी आठ, तर जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाने तीन जागांची मागणी केली. जिल्‍ह्यातील महायुती नेत्‍यांनी त्‍यांची भूमिका मुख्‍यमंत्र्यांसमोर मांडली. बैठकीत जागा वाटपाचा तिढा कायम राहिला असून मुख्‍यमंत्री पुढील दोन दिवसांत निर्णय कळवणार असल्‍याची माहिती महायुती नेत्‍यांनी दिली.

गोकुळ निवडणुकसाठी जागा वाटपासंदर्भात जिल्‍ह्यातील महायुती नेत्‍यांमध्‍ये एकमत न झाल्‍याने मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्‍थानी बुधवारी रात्री बैठक घेतली. बैठकीमध्‍ये राष्‍ट्रवादीचे नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीमध्‍ये गोकुळचे सर्वाधिक ठराव राष्‍ट्रवादीकडे असल्‍याचे सांगत १० जागांची मागणी केली. भाजपचे उच्‍च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक यांनी आठ, तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही शिवसेनेला आठ जागा हव्‍यात असे‍ सांगितले. जनसुराज्‍यचे नेते आ. विनय कोरे यांनीही तीन जागांची मागणी केली. सर्वांची मते जाणून घेतल्‍यानंतर मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी सर्वांना महायुती म्‍हणून गोकुळची निवडणुक एकसंधपणे लढण्‍याची सूचना केली. बैठकीला आमदार अमल महाडिक, माजी आ. के. पी. पाटील, राजेश पाटील, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक, जनसुराज्‍यचे समित कदम आदी उपस्‍थित होते.

एकूण जागा २५, मागणी २९ ची

गोकुळसाठी एकूण जागा २५ आहेत. महायुतीमधील घटक पक्षांनी केलेल्‍या मागणीवरुन ही संख्‍या २९ वर जाते. जागा २५ अन् मागणी २९ ची अशी अवस्‍था बैठकीत झाली. त्‍यामुळे बैठकीत जागा वाटपावर तोडगा निघाला नाही.

स्वीकृतची जागा प्रत्‍येकी एक द्या

बैठकीमध्‍ये २५ जागांसह स्वीकृतच्‍या दोन आणि शासन नियुक्‍त एक अशा तीन जागांवरही चर्चा झाली. चर्चेमध्‍ये या तीन जागा राष्‍ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला प्रत्‍येकी एक देण्‍याची मागणी नेत्‍यांनी केली.

'बिनविरोध'बाबत चर्चा नाही

गोकुळ निवडणूक बिनविरोध होणार, अशीही चर्चा जिल्‍ह्याच्‍या राजकारणात सुरू आहे; पण बुधवारी मुख्‍यमंत्र्यांसोबत झालेल्‍या बैठकीमध्‍ये बिनविरोधबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्‍याचे महायुतीच्या नेत्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news