

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत राष्ट्रवादीला नऊ, भाजप सात, शिवसेना सहा आणि आ. राजेंद्र पाटील- यड्रावकर गटाला एक अशा सात आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन असा महायुतीचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, स्वीकृतमधील एका जागेची जनसुराज्यला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय कळवणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष निर्णयाकडे लागून राहिले आहे.
‘गोकुळ’ निवडणुकीतील जागा वाटपाबाबत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील महायुती नेत्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये राष्ट्रवादीने १०, भाजप-शिवसेनेकडून प्रत्येकी आठ, तर जनसुराज्य शक्ती पक्षाने तीन जागांची मागणी केली. जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने राजकीय वर्तुळातून तर्कविर्तक लढविले जात आहेत.
‘गोकुळ’साठी २५ जागा असून, महायुतीमधील घटक पक्षांनी केलेली मागणी पाहता ती २९ होते. त्यामुळे चार घटक पक्षांनी मागणी केलेल्या संख्येत प्रत्येक पक्षाची जागा कमी करून फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने दहा जागांची मागणी केली असून, त्यांना नऊ तर भाजपला सात जागा मिळणार अशी चर्चा आहे.
राखीव पाच जागांपैकी महिला राखीवमधील दोन पैकी एक आणि इतर मागासची जागा राष्ट्रवादीला जाईल. महिला राखीव करवीर, इतर मागासमधून कागलचा उमेदवार असण्याची शक्यता आहे. अनुसूचितची जागा शिवसेना आणि भटके विमुक्तची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. तर महिला राखीवमधील एक जागा भाजप घेणार का अन्य कोणाला सोडणार हे पाहावे लागणार आहे. अनुसूचितच्या जागेवर जनसुराज्यनेही दावा केला आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना, जनसुराज्यपैकी कोणाला मिळणार याकडेही लक्ष असणार आहे.
राजेंद्र यड्रावकर शिवसेनेचे सहयोगी आमदार आहेत. ‘गोकुळ’ निवडणुकीत त्यांनी सुरुवातील मंत्री मुश्रीफांसोबत राहणार असल्याची घोषणा केली. मात्र, शिवसेनेच्या ठरावधारकांच्या मेळाव्याला त्यांनी उपस्थिती लावली. शिवसेनेने आठ जागांची मागणी केली आहे. मात्र, त्यांना सहा जागा मिळतील, असे जाणकारांचे मत आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातूनच यड्रावकर यांना एक जागा दिली जाईल. त्यामुळे शिवसेनेला सात जागा मिळणार आहेत.