

कोल्हापूर : अवसायन प्रक्रियेतील १,३२० दूध संस्थांपैकी किती संस्था मतदानास पात्र ठरणार आणि किती अपात्र, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. सहायक निबंधक कृष्णा ठाकरे पात्र-अपात्र संस्थांची आकडेवारी जाहीर करणार आहेत. यानंतर याचा निवडणुकीत कोणाला फटका बसणार, हे चित्र स्पष्ट होईल.
तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी १,३२० दूध संस्थांवर आक्षेप घेतल्याने गोकुळची निवडणूक न्यायालयीन कचाट्यात सापडली. न्यायालयाने या दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र-अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी ८० दिवसांची मुदत दिली. ही मुदत २० जुलै रोजी संपत आहे. मुदतीपूर्वी महिनाभर अगोदरच ही प्रक्रिया पूर्ण झाली. पात्र-अपात्र संस्थांना निकालपत्र पाठविण्यात आले आहे.
२६८ संस्थांच्या निकालाची प्रतीक्षा
१,३२० पैकी २६८ संस्थांचे निकाल तत्कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी दिले आहेत; मात्र यावर बेलवाडे यांनी आक्षेप घेतला आहे. या संस्थांची मुंबईत सहनिबंधकांसमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अवसायनातील २६८ संस्थांच्या निकालाची प्रतीक्षा असणार आहे. १ जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत असल्याने या संस्थांचे निकालही लवकर द्यावे लागणार आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यातील दूध संस्थांकडून ठराव दाखल करण्याची लगीनघाई सोमवारपासून सुरू होणार आहे. ठराव स्वीकारण्यासाठी सहायक निबंधक कार्यालय सज्ज झाले आहे. १२ तालुक्यांसाठी १८ टेबल असून ४० कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
सोमवारी ठराव दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता कमी आहे. अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्याने आता ठरावाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. संस्था प्रतिनिधींची होणारी गर्दी पाहता कार्यालयाबाहेर भव्य मंडप उभारत तालुकानिहाय ठरावाच्या प्रती स्वीकारण्याचे नियोजन सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी केले आहे.
एकावेळी एकालाच प्रवेश
कार्यालयाबाहेर भव्य मंडप उभारत मंडपात प्रवेशासाठी बॅरिकेडस् उभारले आहेत. बॅरिकेडमधून एका वेळी एकाच व्यक्तीला मंडपात प्रवेश घेता येईल, असे नियोजन केले आहे. करवीर, राधानगरी, भुदरगड, कागल, पन्हाळा, शाहूवाडी या सहा तालुक्यांसाठी प्रत्येकी २ टेबल असणार आहेत. तर हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, आजरा या तालुक्यांसाठी प्रत्येकी एका टेबलावर ठराव स्वीकारले जाणार आहेत.
आजर्यातील २० संस्थांची आज सुनावणी
तत्कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी निकाल दिलेल्या २६७ संस्थांची मुंबईत सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. कागलमधील २० संस्थांची सुनावणी झाली आहे, तर सोमवारी आजरा तालुक्यातील २० संस्थांना सुनावणीसाठी बोलावले आहे.