Gokul Election | गोकुळ निवडणुकीत नेते, कुटुंबीयांच्‍या नावे ६७ ठराव

सर्वाधिक १४ ठराव मंत्री मुश्रीफ कुटुंबीयांच्‍या नावे; महाडिक ३, आ. सतेज पाटील यांचे ५ ठराव
Gokul Election |
Gokul Election | गोकुळ निवडणुकीत नेते, कुटुंबीयांच्‍या नावे ६७ ठराव
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ गोकुळच्‍या निवडणुकीत जिल्‍ह्यातील प्रमुख नेते व त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या नावे ६७ ठराव दाखल झाले आहेत. यामध्‍ये राष्‍ट्रवादीचे नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या नावे सर्वाधिक १४ ठराव आहेत. कागल तालुक्‍यातील दूध संस्‍थांच्‍या नावे त्‍यांचे ठराव आहेत. त्‍यापाठोपाठ आमदार चंद्रदीप नरके व त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या नावे करवीर, पन्‍हाळा, गगनबावडा या तीन तालुक्‍यांतून ९ ठराव दाखल झाले आहेत.

गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू असून नुकतीच दूध संस्‍थांचे ठराव दाखल करण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली. प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर दाखल झालेल्‍या ठरावांची तालुकानिहाय यादी सोशल मीडियावर व्‍हायरल झाली आहे. आ. सतेज पाटील, माजी आ. ऋतुराज पाटील व कुटुंबीयांच्‍या नावे गगनबावडा, करवीर, हातकणंगले या तीन तालुक्‍यांतून एकूण पाच ठराव दाखल केले आहेत. माजी आ. महादेवराव महाडिक व त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या नावे केवळ तीन ठराव आहेत. हातकणंगले तालुक्‍यातील माजी. आ. महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्‍या नावे प्रत्‍येकी एक ठराव आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्‍हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर व त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या नावे भुदरगड तालुक्‍यातून ६ दूध संस्‍थांच्‍या नावाने ठराव दाखल केले आहेत.

अन्‍य नेते व त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या नावे असलेले ठराव

कागल तालुक्‍यातून माजी खासदार संजय मंडलिक ३, समरजितसिंह घाटगे ६, गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे यांचे ४ ठराव आहेत. आमदार विनय कोरे यांचे पन्‍हाळा तालुक्‍यातून २, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे शिरोळमधून ५, आमदार जयंत आसगावकर यांचा करवीरमधून १ आणि जि.प.चे माजी अध्‍यक्ष राहुल पाटील यांचे करवीरमधून तीन ठराव आहेत. गोकुळचे माजी अध्‍यक्ष अरुण नरके, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके व त्‍यांच्‍या कुटुंबीयांच्‍या नावे करवीर व पन्‍हाळा तालुक्‍यातून सहा ठराव आहेत.

कोर्‍या ठरावधारकांवर विरोधकांची नजर !

कोर्‍या ठरावांवरून दूध संस्‍थांमधील राजकारण तापले आहे. गावागावांत दूध संस्‍थांच्‍या ठरावधारकांच्‍या नावाची चर्चा सुरू आहे. कोरे ठराव दिलेल्‍या काही संस्‍थांचे सभासद आता ठरावधारकांच्‍या नावावरून तक्रार देण्‍याच्या तयारीत आहे. जिल्‍ह्यातील प्रत्‍येक तालुक्‍यात असे प्रकार घडले आहेत.

गोकुळ निवडणुकीतील कोर्‍या ठरावांचा मुद्दा आता ग्रामीण भागात चर्चेत आला आहे. प्रत्‍येक तालुक्‍यातील नेत्‍याने काही दूध संस्‍थांचे ठराव आपल्‍या ताब्‍यात घेत संबंधित

ठराव आपल्‍या मर्जीतील कार्यकर्त्यांच्यानावे दाखल केले आहेत. अशा पद्धतीने ठराव दाखल करताना काहींनी तो ठरावधारक संस्‍थेच्‍या कार्यक्षेत्रातील सभासद आहे का नाही, याकडे दुर्लक्ष करतच ठराव दाखल केला. यापूर्वी या प्रकाराकडे दूर्लक्ष होत होते; मात्र आता ही निवडणुक चुरशीची ठरत असल्‍याने बारीकसारीक गोष्‍टींवरही लक्ष आहे.

काही दूध संस्‍थांमध्‍ये गावातील सत्ताधारी, विरोधी अशा दोन्‍ही गटांचे सभासद आहेत. अशा संस्‍थांच्‍या सभासदांकडून दूध संस्‍थेचा ठराव कोणाच्‍या नावे दिला आहे, याची माहिती घेतली जात आहे. ठराव त्रयस्थ व्‍यक्‍तीच्‍या नावे असल्‍यास सभासदांनी तक्रार दाखल करण्‍याची तयारी केली आहे. सहायक निबंधक कार्यालयाकडे अशा आणखी काही तक्रारी दाखल होण्‍याची शक्‍यता आहे.

सभासद असला, तरी कार्यक्षेत्रातील हवा

कोरा ठराव मर्जीतील कार्यकर्त्याच्‍या नावे असला, तर त्‍याला संबंधित संस्‍थेचा सभासद केले जाते; मात्र संबंधित ठरावधारक हा केवळ त्‍या संस्‍थेचा सभासद असून चालणार नाही. तो संबिधत संस्‍थेच्‍या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे हेदेखील महत्त्‍वाचे असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news