

Satyajeet Patil join Congress
शिरोली दुमाला : गोकुळ दूध संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोकुळचे माजी संचालक आबा उर्फ सत्यजित सुरेश पाटील (कसबा बीड) हे काँग्रेसच्या गोटात जाणार असल्याची चर्चा करवीरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांचा काँग्रेस प्रवेश आजच होण्याची शक्यताही व्यक्त केली जात असून, त्यामुळे राहुल पाटील गटाला हा राजकीय धक्का मानला जात आहे.
सत्यजित पाटील यांचे वडील कै. सुरेश पाटील हेही गोकुळ दूध संघाचे संचालक होते. स्व. आमदार पी. एन. पाटील यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे कसबा बीड येथील पाटील कुटुंबाची राजकीय भूमिका करवीरच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यजित पाटील यांनी सुरुवातीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असल्याची चर्चा होती. मात्र उमेदवारीच्या संभाव्य समीकरणात अपेक्षित स्थान मिळत नसल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली.
दरम्यान, मागील पंधरवड्यात आमदार सतेज पाटील यांनी करवीर दौऱ्यादरम्यान कसबा बीड येथे सत्यजित पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीत गोकुळच्या उमेदवारीबाबत आश्वासन देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे सत्यजित पाटील काँग्रेसच्या गोटात प्रवेश करून सतेज पाटील गटाकडून गोकुळची निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
सत्यजित पाटील यांच्या संभाव्य भूमिकेची चर्चा सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधून मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. मात्र या प्रयत्नांना अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे बोलले जात आहे.
गोकुळच्या उमेदवारीवरून सुरू झालेली नाराजी आता कोणते राजकीय वळण घेते, सत्यजित पाटील नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात आणि त्याचा आगामी गोकुळ निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे करवीर तालुक्याचे लक्ष लागले आहे.