Gokul Election 2026 | अर्ज किती भरले यापेक्षा संख्‍याबळ महत्त्‍वाचे : हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ(File photo)
Published on
Updated on

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीत किती उमेदवारी अर्ज भरले यापेक्षा ठरावांचे संख्‍याबळ किती हे महत्त्‍वाचे आहे. संख्‍याबळानुसारच जागावाटप होईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले. तसेच आठ ऑक्‍टोबरला उमेदवारी अर्ज माघारीच्‍यावेळीच महायुतीच्‍या पॅनेलची घोषणा होईल, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, गोकुळमधील जागावाटपाबाबत अद्याप मुख्‍यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली नाही. संख्‍याबळ निश्‍चित करण्‍यासाठी महायुतीच्‍या जिल्‍ह्यातील नेत्‍यांना एकत्र बसावे लागेल आणि संख्‍याबळ निश्‍चित करावे लागेल. संख्‍याबळानुसारच उमेदवारी ठरेल. तसेच गोकुळमधील अदृश्‍य शक्‍ती लुप्‍त झाल्‍याचे सांगत निवडणूक बिनविरोध होणार नसल्‍याचेही मंत्री मुश्रीफ यांनी स्‍पष्‍ट केले.

दुष्‍काळग्रस्‍त शेतकर्‍यांना मदत

दुष्‍काळग्रस्‍त शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, असे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले आहे. दुष्‍काळसदृश परिस्‍थितीबाबत विशेष अधिवेशन बोलविण्‍याबाबत मुख्‍यमंत्री मंगळवारी मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत भाष्‍य करतील. पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट असून चांगला पाऊस पडेल, असे तज्‍ज्ञांचे मत आहे. ऑगस्‍ट २०२७ पर्यंत पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करूनच शेतीसाठी पाणी वापरावे लागेल.

... तळमळ त्‍यांना स्‍वस्‍थ बसू देत नाही

ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार दुष्‍काळाच्‍या पार्श्वभूमीवर महाराष्‍ट्र दौरा करणार आहेत. वास्‍तविक त्‍यांनी विश्रांती घेण्‍याची गरज आहे. मात्र जनता आणि शेतकर्‍यांप्रती असलेली तळमळ त्‍यांना स्‍वस्‍थ बसू देत नाही, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

परीक्षा पारदर्शक होतील

औषध निरीक्षकपदाच्‍या रद्द झालेल्‍या परीक्षेबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी, मुख्‍यमंत्र्यांनी याबाबत काटेकोर सूचना केल्‍या आहेत. या परीक्षा पुन्‍हा घेतल्‍या जातील. पुढच्‍या काळात पेपर फुटणार नाहीत आणि विद्यार्थ्यांचे कष्‍ट वाया जाऊ नयेत, यासाठी राज्‍य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे अशा परीक्षा पारदर्शकच होतील, असे स्‍पष्‍ट केले.

घटस्‍थापनेला प्रचाराचा प्रारंभ

गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचा ११ ऑक्‍टोबर म्‍हणजेच घटस्‍थापनेला प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. जागावाटप, पॅनेलची घोषणा झाल्‍यानंतर महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी ११ वाजता महायुतीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्‍यातून प्रचाराला सुरुवात केली जाणार असल्‍याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news