

राशिवडे : जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा आर्थिक कणा असलेल्या गोकुळच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीसाठी वर्षाचा अवधी असताना लाखमोलाच्या ठरावासाठी राजकीय यंत्रणा टाईट झाल्या आहेत. ठराव आपल्याकडेच राहावा, यासाठीचे यंत्रणेमार्फत टोकन पोहोच करण्याची धांदल सुरू आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक 703 ठराव राधानगरी तालुक्यात आहेत. आगामी निवडणूक महाविकास विरुद्ध महायुती यांच्यात होणार असल्याची चर्चा असून दोन्हीकडील नेत्यांनी सर्वाधिक ठराव आपल्याकडेच येण्यासाठी नियोजन केले आहे. यापूर्वी गोकुळची निवडणुक पक्षनिहाय न होता आघाडीतून होत असल्याने ठरावधारकांची चांदी होत होती; पण आता महाविकास विरुद्ध महायुती अशी रंगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्हीकडून जास्तीत जास्त ठरावधारकांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात टोकन, त्यानंतर दीपावलीवेळी दुसरा टप्पा व सहलीवर जाताना अंतिम तिसरा टप्पा पूर्ण करण्याची हमी दिली जात आहे.
माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचीही या तालुक्यात राजकीय ताकद आहे, तर महाविकासचे आमदार सतेज पाटील, जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर यांचेही राजकीय वर्चस्व आहे. त्यामुळे कुणाची ताकद जास्त आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. सध्या महाविकासकडून विद्यमान संचालक आर. के. मोरे, अभिजित तायशेटे, तर महायुतीचे अरुण डोंगळे, प्रा. किसन चौगले हे संचालक आहेत. दोन्हीकडेही दिग्गज नेतेमंडळी कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने लाखमोलाच्या सरावासाठी राजकीय यंत्रणा टाईट झाल्या आहेत.
तालुक्यामध्ये कोर्या ठरावासाठी मोठे वजन ठेवले जात आहे. समर्थक, पै-पाहुणे, हितचिंतकांच्या नावावरही ठराव घेण्याची यंत्रणा कार्यरत झाली आहे.