

ठराव दाखल करण्यासाठी सहायक निबंधक कार्यालयात उडणार झुंबड
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
भाजप, शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सोमवारी (दि. २९) शक्तिप्रदर्शन करत दूध संस्थांचे ठराव दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे सोमवार हा शक्तिप्रदर्शनाचा वार ठरणार आहे. तिन्ही पक्ष एकाचवेळी ठराव सादर करणार असल्याने सहायक निबंधक कार्यालयात झुंबड उडणार आहे.
गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू असून सहायक निबंधक कार्यालयात दूध संस्थांचे ठराव दाखल करून घेतले जात आहेत. ठराव दाखल करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. गुरुवारी (दि. २५) राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल केले. आज भाजप, शिवसेना, जनसुराज्य शक्तिप्रदर्शन करणार आहेत, तर मंगळवारी (दि. ३०) आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे शक्तिप्रदर्शन होईल.
भाजपचे ठरावधारक सकाळी १० वाजता महासैनिक दरबार हॉल येथे एकत्र येतील. शिवसेना शिंदे गटाचे ठरावधारकही याचवेळी धैर्यप्रसाद हॉल आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे ठरावधारक रेसिडेन्सी क्लब येथे एकत्र येतील. या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांचा मेळावा होईल. भाजपच्या मेळाव्यात खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आ. राजेश क्षीरसागर, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव, डॉ. सुजित मिणचेकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. आमदार विनय कोरे, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्षाचे ठरावधारक ठराव दाखल करतील.
गोंधळ उडू नये, यासाठी नियोजन आवश्यक
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरावधारक एकाचवेळी ठराव दाखल करण्यासाठी गेल्याने सहायक निबंधक कार्यालयात एकच झुंबड उडाली. सोमवारी (दि. २९) तीन पक्षांचे एकाच वेळी शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे येथे मोठी गर्दी होणार आहे. गर्दीमुळे ठराव दाखल करताना गोंधळ उडणार नाही, यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे.