Gokul Election | बंडखोरी, ताणतणावाने गाजला माघारीचा शेवटचा दिवस; ‘गोकुळ’साठी दुरंगी लढत

Pudhari
GokulPudhari
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ ‘गोकुळ’च्‍या निवडणुकीसाठी गुरुवारी महायुतीमध्‍ये ताणतणाव व बैठकांचे सत्र सुरू होते. तर, समविचारी आघाडीचे नाराजांवर लक्ष होते. राष्‍ट्रवादीत झालेली बंडखोरी, पी. एन. पाटील गटाची नाराजी, शिवसेना-भाजपमध्‍ये उमेदवारांची अदलाबदली अशा नाट्यमय घडामोडींनंतर दुपारी दोन वाजण्‍याच्‍या सुमारास महायुतीचे पॅनेल निश्‍चित झाले. माघारीनंतर ‘गोकुळ’च्‍या २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात राहिल्‍याने दुरंगी लढतीचे चित्र स्‍पष्‍ट झाले.

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी २४० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्‍यासाठी अंतिम मुदत होती. त्‍यामुळे दोन्‍ही आघाड्यांमध्‍ये उमेदवारांची निश्‍चिती करून उर्वरित उमेदवारांना माघार घेण्‍यास सांगताना कस लागला. राष्‍ट्रवादीत माजी संचालक किसन चौगले यांनी बंडखोरी करत समविचारी आघाडीत प्रवेश केला. स्‍व. आ. पी. एन. पाटील गटही दोन जागांसाठी आक्रमक झाला होता.

भाजपच्‍या आ. अमल महाडिक यांच्‍या शाहूपुरी तर त्‍यानंतर खा. धनंजय महाडिक यांच्‍या कावळा नाका येथील संपर्क कार्यालयात बैठक झाली. भाजपमध्‍ये अशोक चराटी यांना संधी मिळाली तर शौमिका महाडिक यांना महिला राखीवमधून उमेदवारी दिली. शिवसेनेतही आ. चंद्रदीप नरके यांनी चारा जागा पदरात पाडल्‍या. तर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर गटाचे अशोक फराकटे यांचे नाव मागे पडले. या सर्व घडामोडींनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दुपारी अडीच वाजता महायुतीच्‍या तर सायंकाळी पाच वाजता आ. सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीच्‍या पॅनेलची घोषणा केली.

अखेरच्‍या दिवशी १४१ उमेदवारांची माघार

अखेरच्‍या दिवशी सर्वसाधारण गटातून ८२, महिला राखीव २०, इतर मागास २७, भटके विमुक्‍त ७, अनुसूचित जाती गटातून ५ अशा १४१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर, यापूर्वी ४९ उमेदवारांनी माघार घेतली होती. त्‍यामुळे आता ५० उमेदवारांचे अर्ज शिल्‍लक राहिल्‍याने दुरंगी लढतीचे चित्र स्‍पष्‍ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news