Gokul Election 2026 | एकच जागा मिळाल्याने पी. एन. पाटील गट आक्रमक

Gokul Election 2026 |
कोल्हापूर : शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेच्या बाहेर पी. एन. पाटील गटाचे समर्थक आक्रमक झाले होते. (छाया : मिलन मकानदार)
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : राष्‍ट्रवादीतून स्‍व. आ. पी. एन. पाटील गटाला दोन जागांची अपेक्षा होती. मात्र, एकच जागा मिळाल्‍याने गटाचे समर्थक आक्रमक झाले. शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत गटाचे समर्थक एकत्र आले होते. बाळासाहेब खाडे यांची उमेदवारी डावलल्‍याने कार्यकर्त्यांत प्रचंड असंतोष होता. यामुळे शाहूपुरीत बँकेत वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्‍यांनी स्‍वतंत्र निर्णय घ्‍या, अशा भावना व्‍यक्‍त केल्‍या.

राष्‍ट्रवादीतून पाटील गटाला करवीरमधून एकच जागा मिळाल्‍याने पाटील गटाचे समर्थक गुरुवारी सकाळी शाहूपुरीत एकत्र आले. येथे श्रीपतरावदादा बँकेत कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्‍यानंतर जि.प.चे माजी अध्‍यक्ष राहुल पाटील कागलला मंत्री मुश्रीफ यांची भेट घेण्‍यासाठी निघून गेले. येथे दुपारपर्यंत कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू होता. महिला राखीव गटातून तेजस्‍विनी पाटील यांची उमेदवारी निश्‍चित होती. मात्र, राहुल पाटील यांनी एकच जागा देणार असाल तर महिला राखीवमधून नको, सर्वसाधारण गटातून उमेदवारी द्या, असा आग्रह धरला. अखेर राहुल पाटील यांना सर्वसाधारण गटातून उमेदवारी देण्‍यात आली. तसेच गटाला एक स्‍वीकृतचीही जागा मिळणार आहे. दुपारपर्यंतच्‍या ताणतणावाच्‍या परिस्‍थितीनंतर अखेर दुपारी अडीच वाजता बाळासाहेब खाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

सतेज पाटील यांच्याशी संपर्क

स्‍व. आ. पी. एन. पाटील गटाला राष्‍ट्रवादीतून एकच उमेदवारी मिळाल्‍याने गटाचे प्रमुख कार्यकर्तेही वेगळा विचार करण्‍याच्‍या तयारीत होते. काही कार्यकर्त्यांनी आ. सतेज पाटील यांच्‍याशी संपर्कही साधला. मात्र, आ. पाटील यांनी राहुल पाटील अथवा राजेश पाटील चर्चा करू देत मग विचार करू, असे उत्तर कार्यकर्त्यांना दिले. मात्र, राहुल पाटील यांनी राष्‍ट्रवादीसोबतच राहण्‍याचा निर्णय घेतल्‍याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

राष्‍ट्रवादीसोबतच राहणार

दरम्‍यान, राहुल पाटील, राजेश पाटील यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना राष्‍ट्रवादीसोबतच राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तसेच बाळासाहेब खाडे यांनीही नेत्‍यांच्‍या आदेशानुसार माघार घेणार असून, कोणताही वेगळा विचार करणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news