Gokul Dudh Sangh Election : ‘गोकुळ’च्या अपात्र ठरलेल्या ४२७ संस्थांना मोठा धक्का; ३९३६ संस्थांना ठरावाचे नमुने जारी

Kolhapur Gokul Dudh Sangh Election
Kolhapur Gokul Dudh Sangh ElectionPudhari
Published on
Updated on

आशिष ल. पाटील

गुडाळ : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 'कट-ऑफ डेट'मधील ५,४७० दूध संस्थांपैकी आजअखेर ३,९३६ संस्थांना प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांच्या कार्यालयामार्फत ठरावाचे नमुने पाठवण्यात आले आहेत. यात तत्कालीन सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी पात्र ठरवलेल्या २६७ संस्थांपैकी २६५ संस्थांचा समावेश आहे.

४२७ संस्थांना वगळले

दरम्यान, मावळत्या संचालक मंडळासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पोटनियमांचे उल्लंघन करून सभासदत्व घेतलेल्या ४२७ संस्थांचा प्रशासक मंडळाने पात्र यादीत समावेश न केल्याने, या संस्थांना ठरावाचे नमुने न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवसायनातील उर्वरित संस्थांच्या सुनावणीत जशा संस्था पात्र ठरतील, त्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ठरावाचे नमुने पाठवले जातील, अशी माहिती प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांनी दिली. सुनावणीनंतर पात्र ठरणाऱ्या संस्था मतदार यादीपासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्कालीन सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी अवसायनातील २६७ संस्था पात्र ठरवल्या होत्या. त्यापैकी दोन संस्था पोटनियमांचे उल्लंघन करून सभासद झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना वगळून उर्वरित २६५ संस्थांना ठरावाची पत्रे पाठवण्यात आली आहेत. ७ जूनपर्यंत अवसायनातील उर्वरित पात्र संस्थांना ठरावाची पत्रे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर गोकुळच्या मतदानासाठी पात्र ठरणाऱ्या एकूण संस्थांचा आकडा स्पष्ट होईल.

मावळत्या संचालक मंडळाला मोठा धक्का

दूध संस्था नोंदणीनंतर सलग ९० दिवस दूध पुरवठा केल्यानंतरच संस्थेला सभासदत्व देण्याचा गोकुळचा पोटनियम आहे. मात्र, मावळत्या संचालक मंडळाने ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ४२७ संस्थांना सभासदत्व बहाल केले होते. या संस्थांच्या चौकशीची मागणी प्रकाश बेलवाडे यांनी केली होती. शासनाच्या विशेष चौकशी समितीने या संस्था अपात्र ठरवल्यामुळे प्रशासक मंडळाकडून या संस्थांचा समावेश 'कट-ऑफ डेट'च्या यादीत होऊ शकला नाही. या निर्णयामुळे मावळत्या संचालक मंडळाला मोठा धक्का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news