

कोल्हापूर ः सहकारात राजकारण नसते असा वारंवार उपदेश करणार्या गोकुळमधील नेत्यांना आता राजकारणाचे धक्के बसत आहेत. गोकुळच्या सत्तांतरानंतर महायुतीच्या नेत्यांच्या भेटीसाठी गेलेल्या संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाकडे सतेज पाटील समर्थक पाच संचालकांनी पाठ फिरविली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनय कोरे यांच्याशिवाय संचालक मंडळाला जाता येणार नाही. त्यामुळे कोरे यांच्या समवेत ही भेट निश्चित झाल्याचे समजते.
गोकुळमध्ये नाट्यपूर्ण घडामोडीनंतर नविद मुश्रीफ हे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाचे नाव विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे देण्यात आले. सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचा अध्यक्ष झाल्याची प्रतिक्रिया दिली, तर धनंजय महाडिक यांनी कोणी काही म्हटले तरी गोकुळचे अध्यक्ष महायुतीचेच, असे सांगितले. स्वतः अध्यक्ष मुश्रीफ यांनी ‘हम सब एक है’ असे सांगून यातून बाजू निभावण्याचा प्रयत्न केला.
गोकुळच्या अध्यक्षांसह संचालक महायुतीच्या नेत्यांना भेटण्यासाठी बुधवारी मुंबईला गेले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, यावेळी सतेज पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील-नेर्लीकर, अंजना रेडेकर व बयाजी शेळके, आर. के. मोरे या पाच संचालकांनी पाठ फिरविली. आघाडीचा अध्यक्ष असताना केवळ महायुतीच्या नेत्यांची भेट का असा प्रश्न त्यांच्या भेटीपूर्वीच उपस्थित करण्यात आला होता. विश्वास पाटील मात्र यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ संचालक मंडळाला बुधवारी भेटीची वेळ दिली होती. गोकुळचे नेते आणि महायुतीतील जनसुराज्य शक्ती या घटक पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्यासमवेतच मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे नियोजन पुढील आठवड्यात करण्यात आले आहे. विनय कोरे नसल्यामुळे ही भेट झाली नाही. हसन मुश्रीफ यांनी पुढील आठवड्यात फडणवीस व शिंदे यांची भेट घेऊ असे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीची वेळ दिली होती. मात्र ते नियोजित बैठकीसाठीच न आल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. चंद्रदीप नरके हे बुधवारी मुंबईतच होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवेळी हे तिघेही अनुपस्थित होते. तो चर्चेचा विषय ठरला.