

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळ संचालक मंडळ अपात्रप्रकरणी दाखल याचिकेत कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य शासनाला 21 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. याप्रकरणी पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे. तर निवडणूक संदर्भात दूध संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेतही 22 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले असून, पुढील सुनावणी 28 एप्रिलला होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये बुधवारी (दि.8) सकाळच्या सत्रात गोकुळ संचालक मंडळ अपात्रप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीमध्ये गोकुळच्या चाचणी व विशेष लेखापरीक्षणवर युक्तीवाद झाला. यामध्ये याचिकाकर्ते महादेव दूध संस्थेचे वकील सतीश तळेकर यांनी चाचणी व विशेष लेखापरीक्षण या दोन्ही बाबी वेगळ्या असून, विशेष लेखापरीक्षणामध्ये गोकुळच्या संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
गोकुळ निवडणुकीबाबत दूध संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर दुपारच्या सत्रात सुनावणी झाली. यामध्ये काही दूध संस्थांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत तर काही दूध संस्थांनी 1200 दूध संस्थांबाबत निर्णय घेवूनच निवडणूक घ्या, अशी मागणी केली आहे. या याचिकांमध्ये दोन्ही बाजूच्या वकीलांचा युक्तिवाद झाल्यानंतर यासंदर्भातही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले.