

कोल्हापूर : डिबेंचरचा निर्णय सासर्यांचा आणि मोर्चा काढते सून, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी, तर ‘त्यांनी’ गोकुळमध्ये जावयाला मोठे केले नाही, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांवर लगावला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ‘गोकुळ’मध्ये राजकीय फटाकेबाजी झाली.
ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात वसुबारसनिमित्त गाय-वासरूच्या पूजनाचा पारंपरिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर मंत्री मुश्रीफ, आ. पाटील, आ. चंद्रदीप नरके यांची राजकीय टोलबाजी रंगली. बहुतांशी नेत्यांनी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनाच लक्ष्य केले. डिबेंचरवरून ऐन सणासुदीत गोकुळचे वातावरण तापले आहे. मात्र, आजच्या कार्यक्रमात उपस्थितांनी वातावरण सौम्य करण्याचा प्रयत्न केला. मुश्रीफ म्हणाले, डिबेंचरबाबत बाळासाहेब खाडे यांनी अजित नरके यांच्याशी आपली चर्चा झाल्याचे आपणाला सांगितले. आता या दोन संचालकांत चर्चा झाली असेल तर मला आणि सतेज पाटील यांना केवळ मान हलवायचेच काम राहिले, असे सांगितले. त्यावर गोकुळ एका व्यापाराचा होता कामा नये, असे सांगत पाटील यांनी महाडिक यांच्यावर निशाणा साधला.
आ. नरके यांनी आपण संस्थेत निवडणूक झाली की येत नसल्याचे सांगताच मुश्रीफ म्हणाले, अधूनमधून येत जावा. यावर नरके म्हणाले, तुम्ही आणि पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे. त्यावर सतेज पाटील यांनी, मध्येच एकट्याला मला बाजूला करा, अशी टिपणी केली. यावर नरके म्हणाले, यात मुश्रीफ यांचा काही दोष नाही. या सर्व घटनेला पालकमंत्री प्रकाश आबिटकर साक्षीदार आहेत. पाटील तुम्ही कधी तरी आमचे ऐकत जावा. ऐकत नाही हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. यावर पाटील म्हणाले, मी गायीसारखा वात्सल्यप्रिय आहे. त्यावर नरके म्हणाले, बरोबर आहे पण, गाय चारा टाकण्यासाठी गेलेल्यांनाच कधी कधी शिंग मारते त्याचे काय? असा सवाल करताच पाटील यांनी त्यांना हसून प्रतिसाद दिला.