

सरूड : गेल्या पाच वर्षांत गोकुळशी जोडलेल्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कारभार करण्यात आला आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ दूध संघ राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या ताब्यातच राहावा, अशी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची भावना आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी केले.
सरूड (ता. शाहूवाडी) येथे गोकुळ संलग्न दूध संस्थांच्या ठरावधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आ. पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून गोकुळ दूध संघ उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. हा डाव हाणून पाडण्यासाठी राजर्षी शाहू समविचारी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी ठरावधारकांना केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर होते.
दरम्यान, राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर समर्थक विकास पांडुरंग पाटील (गोगवेकर) यांच्या नावाची घोषणा यावेळी व्यासपीठावरून करण्यात आली.
आ. सतेज पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेला गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे. यासाठी आम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना सरूडकर गटाची साथ मिळाली आहे. ही साथ आमच्या विजयाची नांदीच आहे.’’
महायुतीमध्ये ताळमेळ नसल्याचा आरोप करत ते म्हणाले, ‘‘महत्त्वाचे सर्व निर्णय मुंबईत घेतले जातात. काल महायुतीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. मात्र, मुख्यमंत्री नागपूरला निघून गेले. आजपर्यंत असे कधी घडले नव्हते.’’ या घटनेचा संदर्भ देत त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ‘‘गोकुळमध्ये आम्ही स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे पुन्हा आमचीच सत्ता येईल,’’ असा विश्वासही आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे, बाबासाहेब देवकर, रणजीतसिंह पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर यांची भाषणे झाली. शेकापचे भारत पाटील, हंबीरराव पाटील, पंचायत समिती सदस्य अभयसिंह चौगुले, माजी सभापती विजय खोत यांच्यासह तालुक्यातील गोकुळ ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.