gokul | ‘गोकुळ’चा कारभार राजकीय दबावाशिवाय
कोल्हापूर : गोकुळचा कारभार कोणत्याही राजकीय दबावाशिवाय, कायदेशीर मार्गाने, पारदर्शक पद्धतीने व शेतकर्यांच्या हितासाठीच चालवला जातो. अफवांपेक्षा वस्तुस्थितीकडे पाहणे आणि गोकुळवरील विश्वास कायम ठेवणे, हीच काळाची गरज असल्याचे पत्रक गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दिले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, गोकुळच्या विविध कामकाजांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोकुळच्या निर्णय प्रक्रियांमध्ये कायद्याचे व सहकार तत्त्वांचे काटेकोर पालन केले जाते. गोकुळच्या यशामध्ये सभासद शेतकर्यांचा मोलाचा सहभाग आहे. गोकुळच्या कार्यक्षेत्रात 1 हजार 236 गावे व 6 हजार 316 दूध संस्थांचा समावेश आहे. काही तालुक्यांमध्ये संस्थांचे प्रमाण व सभासदसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक भागाचे योग्य प्रतिनिधित्व होण्यासाठी संचालकसंख्या वाढवण्याचा निर्णय सहकारी संस्था कायद्यानुसार घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षात गोकुळने 215 कोटींचा ढोबळ नफा मिळवला असून, 186.20 कोटी थेट शेतकरी व कर्मचार्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे नियोजन आहे.
मार्च 2024 मध्ये गोकुळच्या ठेवी 248 कोटी होत्या, त्या मार्च 2025 मध्ये 512 कोटी झाल्या आहेत. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थांना वाटप करण्यात आलेल्या जाजम व घड्याळाची खरेदी संचालक मंडळाच्या ठरावानुसार निविदा प्रक्रिया राबवूनच केली आहे. कोव्हिड काळात उभारण्यात आलेला ऑक्सिजनचा प्लांट सध्या जरी बंद असला, तरी हा प्रकल्प शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत केवळ सामाजिक उत्तरदायित्व म्हणूनच उभारण्यात आला. आयकर परतावा म्हणून मिळालेली 31.55 कोटींची रक्कम संस्थेच्या ठेवींमध्ये गुंतवण्यात आली असून, यामध्ये कोणताही अनियमितता नसल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
भोकरपाडा जमीन : कोणताही व्यवहार झाला नाही
भोकरपाडा औद्योगिक वसाहतीमधील जमीन खरेदीचा प्रारंभिक प्रस्ताव विचाराधीन ठेवण्यात आला होता. मात्र, शासनस्तरावरील अडथळे व जमीन तांत्रिकद़ृष्ट्या न विकत घेता येणारी असल्यामुळे, गोकुळने कोणतीही रक्कम खर्च न करता हा प्रस्ताव रद्द केला आहे.
पत्रकातील मुद्दे
गोकुळचा कारभार शेतकरी हिताचा आणि पारदर्शक
ऑक्सिजन प्रकल्प केवळ सामाजिक बांधिलकीतून
आयकर परताव्याच्या रकमेची गुंतवणूक
दूध दरवाढीत सातत्य; नफ्याचा थेट लाभ शेतकर्यांना
जाजम खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे

