

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’साठी रविवारी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान झाले. ५४१८ पैकी ५४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील प्रत्येकी एका ठरावधारकाने मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवली. तर उर्वरित १० तालुक्यांत चुरशीने १०० टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सर्व ३५ केंद्रांवर मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली.
मतदान केंद्रांवर चुरस, ईर्ष्या पाहायला मिळाली असली तरी सर्वत्र शांततेत मतदान झाले. सर्व केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. रमणमळा येथे सोमवारी (दि. १९) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. कौल कुणाला मिळणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
गोकुळसाठी रविवारी जिल्ह्यात तालुकास्तरावर मतदान झाले. ३५ मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदार येत होते. मात्र बहुतांश तालुक्यांत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि राजर्षी शाहू समविचारी आघाडीचे ठरावधारक निश्चित केलेल्या ठिकाणी एकत्र आले. तेथून शक्तिप्रदर्शन करत सर्व ठरावधारक मतदान करण्यासाठी ज्या त्या तालुक्यातील मतदान केंद्रात दाखल झाले. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी ठरावधारकांच्या रांगा लागल्या होत्या. शक्तिप्रदर्शनाने ठरावधारकांनी केलेल्या घोषणाबाजीतून मतदार प्रक्रियेतील चुरस अन् ईर्ष्या दिसून आली.
सात तालुक्यांत दुपारीच १०० टक्के मतदान
दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. करवीर, कागल, गगनबावडा, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, शिरोळ या सात तालुक्यांत दुपारी चारपर्यंत; तर हातकणंगले, भुदरगड व शाहूवाडी तालुक्यांत अंतिम मतदान वेळेपर्यंत १०० टक्के मतदान झाले.
प्रकाश बेलवाडे यांची मतदानाकडे पाठ
गोकुळ संलग्न १४०० दूध संस्थांचा मतदार यादीतील समावेशावरून आक्षेप घेणारे तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी आजरा तालुक्यातून मतदानाकडे पाठ फिरविली; तर गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील महादेव चौगुले हे ठरावधारक अंतिम मतदार यादी निश्चित झाल्यानंतर दोन दिवसांनी मयत झाले. त्यामुळे त्यांचे मतदान होऊ शकले नाही.