

धीरज बरगे
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणूक प्रचारासाठी महायुतीसह समविचारी आघाडीने घटस्थापनेचा मुहूर्त साधला. विजयापर्यंत पोहोचण्याचे दोन्ही आघाड्यांसमोर कडवे आव्हान असल्याने शारदीय नवरात्रौत्सवाच्या जागराला ‘गोकुळ’च्या विजयाचं सोनं कोण लुटणार, याकडे संपूर्ण जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. या रणांगणात मंत्री हसन मुश्रीफ यांची कॉलर ताठ राहणार का, आ. सतेज पाटील महायुतीचे चक्रव्यूह भेदण्यात यशस्वी होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पॅनेलची सर्व जबाबदारी मंत्री मुश्रीफ यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पॅनेल विजयी करून कॉलर ताठ ठेवण्याचे आव्हान मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आहे. तर एकाकी लढा देणारे आ. सतेज पाटील यांची महायुतीमधील अंतर्गत नाराजीचा फायदा उठवत विजयाचा जागार घालण्याची रणनीती कितपत यशस्वी होणार हे मतमोजणी दिवशी कळेल.
क्रॉस व्होटिंगचा धोका, शपथा
महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी क्रॉस व्होटिंगचा धोका आजही कायम आहे. नेत्यांनाही पॅनेल टू पॅनेल मतदान होईल, याची शाश्वती नसल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर ‘गोकुळ’ची जबाबदारी सोपवली आहे. त्यांना दोष लागणार नाही, त्यांची कॉलर ताठ राहील असे काम करा, असे आवाहन केले. तर मंत्री मुश्रीफ यांनी करवीरच्या मेळाव्यात उलटा विचार करू नका, माझी इज्जत राखा, असे आवाहन केले. यावरून महायुतीमध्ये क्रॉस व्होटिंगची भीती कायम असल्याचे दिसून येते. अखेर शपथा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
शपथा, ‘गोकुळ’ मोडण्याचा डाव.. समविचारीचे हत्यार
समविचारी आघाडीने महायुतीसमोर कडवे आव्हान निर्माण केले असले, तरी महायुतीमधील अंतर्गत नाराजीवर त्यांच्या विजयाची भिस्त अवलंबून असणार आहे. त्यामुळे चार हजार ठराव आहेत म्हणता मग ठरावधारकांना शपथा का घालता, असा प्रश्न आ. सतेज पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, महायुतीचे ‘गोकुळ’बाबतचे सर्व निर्णय मुंबईतून होतात. गोकुळ अमुलच्या दावणीला बांधून मोडीत काढण्याचा प्रयत्न महायुतीचा आहे, असाही गंभीर आरोप आ. पाटील यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या रणांगणात ही वक्तव्येच समविचारी आघाडीच्या प्रचाराची हत्यारे बनली आहेत. मात्र, समविचारीच्या या हत्यारांचे वार त्यांना विजयादशमीला ‘गोकुळ’च्या विजयाचं सोनं लुटू देणार का, याचे चित्र जागरादिवशी स्पष्ट होईल.