

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, संचालक मंडळाची मुदत संपत असून संचालक मंडळाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’कडून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली असल्याची माहिती तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी दिली. यावर आक्षेप घेतला असून, यासंदर्भात गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे बेलवाडे यांनी सांगितले.
संचालक मंडळ अपात्र करा, निवडणूक तत्काळ घ्या, यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांवर बुधवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. ‘गोकुळ’च्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांवर आक्षेप घेतल्याचे सांगत वेळेअभावी सुनावणी थांबली. त्यामुळे आज सुनावणी पूर्ण होऊ शकली नसल्याचे बेलवाडे यांनी सांगितले.
अवसायनप्रकरणी 9 आणि 10 नोव्हेंबर 2023 रोजी पारित केलेल्या समाप्तीचे अंतरिम आदेश कायम ठेवले, तर तात्पुरत्या मतदारयादीत या दूध संस्थांचा समावेश केला जाणार नाही. जर या दूध संस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समाप्तीचे अंतरिम आदेश रद्द केले गेले, तर या सर्व दूध संस्थांची नावे तात्पुरत्या मतदारयादीत समाविष्ट केली जातील. सहायक निबंधक यांनी समाप्ती कार्यवाहीत दिलेल्या आदेशांच्या आधारे ‘गोकुळ’ला मतदारांची नवीन यादी तयार करण्याचे निर्देश दिले जातील. तसेच, जिल्हा निवडणूक अधिकारी यांना तात्पुरत्या मतदारयादीनुसार ‘गोकुळ’ संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले जातील, असे प्रतिज्ञापत्र शासनाने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सादर केले आहे, यावरही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया कधी सुरू करायची, याबाबत कायदेशीर बाबी तपासून पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीबाबत निर्णय घेतील, अशी माहिती आमदार शिवाजी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
आ. पाटील म्हणाले, ‘गोकुळ’संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मंगळवारी मुंबईत जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नेत्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दुसर्या मिनिटाला ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त होणार, हे स्पष्ट केले. प्रशासक नियुक्तीनंतर किती दिवसांत निवडणूक घ्यावी, याबाबत मार्गदर्शन घेऊन ते दोन दिवसांत निवडणुकीबाबतही निर्णय घेतील, असे आ. पाटील यांनी सांगितले.