

आशिष पाटील
गुडाळ : ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीअखेर सर्व गटांतून मिळून एकूण ३०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, बुधवारी होणाऱ्या छाननीत किती जणांचे अर्ज अपात्र होणार याकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सर्वसाधारण गटातून एका मावळत्या संचालकाचा अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
निवडणूक लढवण्याच्या पात्रतेसाठी असलेल्या कडक पोटनियमातून अनेक मातब्बरांचे अर्ज छाननीत अपात्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः, राखीव गटातील अर्जदारांनाही सर्वसाधारण गटातील जवळपास सर्व निकष लागणार असल्याने राखीव गटातील अनेक अर्ज अपात्र होण्याचे संकेत आहेत. बुधवारी दोन्ही आघाड्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी नामवंत वकिलांची फौज छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
‘गोकुळ’ची निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी संबंधित उमेदवार प्रतिनिधित्व करत असलेल्या संस्थेत संचालक असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर या संस्थेने लगतच्या तीन वर्षांत प्रतिवर्षी २४० दिवस, ४० हजार लिटर दूधपुरवठा करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या संस्थेने दरवर्षी ‘गोकुळ’चे १० टन पशुखाद्य खरेदी करणे, संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ किंवा ‘ब’ असणेही बंधनकारक आहे. राखीव जागांवर लढणाऱ्या उमेदवारासाठी नावावर ठराव नसला, तरी ‘गोकुळ’च्या संलग्न दूध संस्थेला संचालक असण्याची अट आहे.