

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून २५ जूनला, शिवसेना शिंदे गटाकडून २९ जूनला, तर काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून ३० जूनला सहायक दुग्ध निबंधक कार्यालयात ठराव दाखल केले जाणार आहेत.
‘गोकुळ’ निवडणुकीत ठराव सादर करणे हे संबंधित गटाकडे किती मतदार आहेत, याचे शक्तिप्रदर्शन मानले जाते. त्यामुळे यंदाही विविध राजकीय गटांकडून आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने ठरावधारकांना एकत्र आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, ठरावांचे गठ्ठे सादर केले जाणार नसून प्रत्येक ठरावधारक स्वतंत्रपणे कार्यालयात जाऊन आपला ठराव दाखल करणार आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच २५ जूनला शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल करण्याची घोषणा केली आहे. महासैनिक दरबार हॉल येथून ठरावधारक दुग्ध विभाग कार्यालयाकडे जाणार असून, यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे किती ठराव आहेत, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, ‘गोकुळ’मध्ये सत्तेत असलेल्या आणि महायुतीच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या आमदार सतेज पाटील गटाने काँग्रेससह समविचारी पक्षांची आघाडी केली आहे. या आघाडीकडून ३० जूनला शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथे ठरावधारक एकत्र येतील आणि तेथून दुग्ध विभाग कार्यालयाकडे रवाना होतील.
शिवसेना शिंदे गटाकडूनही ‘गोकुळ’मध्ये आपली ताकद दाखविण्याची तयारी केली आहे. यापूर्वी २२ जूनला ठराव दाखल करण्याचे नियोजन होते. मात्र, अधिवेशन आणि पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर तारीख बदलून आता २९ जूनला शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन केले जात आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर भाजपकडून ठराव दाखल करण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. यासाठी महायुतीतील नेत्यांची बैठक होणार असून, त्यानंतर भाजपच्या हालचाली स्पष्ट होतील.