

कोल्हापूर : गोकुळच्या वतीने दूध उत्पादक शेतकर्यांसाठी गाय व म्हैस दुधाच्या खरेदी दरात एक रुपयाची वाढ केल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली. एक सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. याशिवाय संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन व मुक्त गोठा योजनेच्या अनुदानातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध संस्था व संस्था कर्मचारी सक्षम व्हावेत यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोकुळतर्फे दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, संस्था सचिव यांना खास भेट जाहीर करण्यात आली आहे. साडेचार ते पाच लाख दूध उत्पादक शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
कोल्हापूर : गोकुळच्या वतीने दूध खरेदी दरासह इमारत अनुदान, कर्मचारी प्रोत्साहनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन जनावरांच्या गोठ्यांना देण्यात येणार्या अनुदानामध्ये निकषात बदल करण्याचा निर्णय गोकुळच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली.
दूध खरेदी दरातील वाढीमुळे महिन्याला साधारणपणे साडेचार ते पाच कोटी जादा रक्कम दूध उत्पादकांना मिळणार आहे. ही दरवाढ करताना दुधाच्या विक्री दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. दूध संस्थांच्या वतीने इमारत अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. ही मागणी देखील आता पूर्ण होणार आहे. दूध संस्थेच्या संकलनानुसार अनुदानात 8 ते 10 हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक दूध संस्थांच्या कर्मचार्यांच्या पगारासाठी प्रोत्साहनपर 65 पैशावरून 70 पैसे करण्यात येणार आहे. मुक्त गोठा अनुदान योजनेत यापूर्वी किमान 5 जनावरांपर्यंतच्या गोठ्यांना अनुदान दिले जात होते. ती अट शिथिल करून 5 ऐवजी 4 जनावरे असलेल्या मुक्त गोठ्यालाही अनुदान देण्यात येईल, असे मुश्रीफ यांनी सागितले.
फॅट, एस.एन.ए. : पूर्वीचे दर : नवीन दर
6.0/9.0 : 50 रुपये 50 पैसे : 51 रुपये 50 पैसे
6.5/9.0 : 54 रुपये 80 पैसे : 55 रुपये 80 पैसे
7.0/9.0 : 57 रुपये 50 पैसे : 58 रुपये 50 पैसे
7.5/9.0 : 59 रुपये : 60 रुपये
फॅट, एस.एन.ए. : पूर्वीचे दर : नवीन दर
3.5/8.5 : 32 रुपये : 33 रुपये
4.0/8.5 : 33 रुपये 50 पैसे : 34 रुपये 50 पैसे
5.0/8.5 : 36 रुपये 50 पैसे : 37 रुपये 50 पैसे
सरासरी दूध संकलन : पूर्वीचे अनुदान : नवीन अनुदान
1 ते 100 लिटर : 32 हजार रु. : 40 हजार रुपये
101 ते 200 लिटर : 37 हजार रु. : 45 हजार रुपये
301 ते 500 लिटर : 45 हजार : 55 हजार
501 लिटरच्या पुढे : 50 हजार : 60 हजार