

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये दोन वर्षांपूर्वी सत्ताधार्यांनी केलेल्या बढत्या बेकायदेशीर ठरवत प्रशासक मंडळाने शनिवारी त्या रद्द केल्याचे समजते. गोकुळ शिरगाव येथे प्रधान कार्यालयात झालेल्या पहिल्याच बैठकीत प्रशासकीय मंडळाने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. त्याबाबत रात्री उशिरापर्यंत प्रशासन मंडळाने दुजोरा दिला नाही.
प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कथित वशिलेबाजीचा मुद्दा रडारवर आला. कामगार अधिकार्यांना नोटीस बजावून आवश्यक कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत पशुखाद्य दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. उत्पादन खर्च वाढला असला, तरी दूध उत्पादकांवर आर्थिक भार न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दरवाढीऐवजी पशुखाद्याचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे ठरले.
कामचुकारांवर कारवाईचा इशारा
या बैठकीत प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सुद्रीक यांनी कामचुकार कर्मचार्यांवर कारवाईचा इशारा दिला. मार्केटिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी सुपरवायझर दर्जाच्या कर्मचार्यांना मार्केटिंग अधिकार्यांची जबाबदारी दिली जाईल. त्यांना दोन तासांऐवजी आठ तासांची ड्युटी देणार असून एमबीए, पदवीधारकांना प्राधान्य देण्याचेही बैठकीत ठरले.