सर्वमान्य नाव निश्चितीनंतर डोंगळे पद सोडतील : मुश्रीफ

गोकुळ अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा चेंडू पुन्हा डोंगळे यांच्या कोर्टात
gokul chief arun dongale to resign after meeting Chief Minister and Deputy Chief Minister says mushrif
हसन मुश्रीफ, अरूण डोंगळे(Pudhari Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळ अध्यक्षपदासाठी सर्वमान्य नावाची निवड केल्यानंतर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून पदाचा राजीनामा देतील, अशी अपेक्षा गोकुळचे नेते हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे गोकुळ अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा चेंडू पुन्हा डोंगळे यांच्या कोर्टात गेला असल्याचे मानले जाते.

डोंगळे यांनी महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तरच आपण राजीनामा देऊ अशी भूमिका जाहीर केल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतरच आपण राजीनामा देऊ अशी भूमिका डोंगळे यांनी जाहीर केली होती.

दरम्यान, एका लग्नसमारंभात डोंगळे यांच्याशी आपली सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. गोकुळची निवडणूक राजर्षी छत्रपती शाहूरायांच्या नावाने आघाडी करून लढविली आहे. येथे कोणतेही पक्षीय राजकारण नव्हते. सत्तारुढ आघाडीच्या कारभाराविरेाधात निवडणूक होती. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी आघाडीच्या बाजुने कौल दिला. त्यामुळे दोन वर्षांनंतर डोंगळे यांनी ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. परंतू मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्यानंतर गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा असावा यासाठी फडणवीस व शिंदे यांनी राजीनामा देऊ नका, असे सांगितल्याचे डोंगळे म्हणतात. त्यामुळे आपल्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. विनय कोरे, आ. सतेज पाटील, माजी आ. के. पी. पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरच आम्ही सर्वमान्य नाव निश्चित करू. ते नाव त्यांनाही मान्य असणार आहे. नाव निश्चित झाल्यानंतर डोंगळे स्वत: आपला राजीनामा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे देतील, अशी अपेक्षा असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

कौलव जि.प. मतदारसंघ डोंगळेंना सोडणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर गोकुळबाबत विषय काढला तर त्यांनाही आपण वस्तुस्थिती समजावून सांगू. यासंदर्भात अद्याप त्यांच्याशी आपले कोणतेही बोलणे झालेले नाही, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, डोंगळे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आम्ही त्यांना कौलव जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्याचे मान्य केले आहे. हे करत असताना पालकमंत्री आबिटकर यांच्यासह संबंधित तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे. वेळ आल्यानंतर आम्ही ती चर्चा करू, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

घोडे मैदानात सोडलेलेच नाही

घोड्याला मैदानात सोडल्यानंतर तो पळणार कसा, जिंकणार कसा हे दिसून येईल. घोड्याला अजून मैदानातच सोडलेले नाही. त्यामुळे प्रश्नच नाही. अजून त्यांना खूप दिवस प्रतिक्षा करावी लागेल, असे सांगून मुश्रीफ यांनी नाविद मुश्रीफ अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले.

विश्वास पाटील यांच्यावर जबाबदारी

अरुण डोंगळे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यावर नेत्यांनी सोपविली आहे. त्याप्रमाणे चर्चा सुरू आहे. गोकुळमधील आघाडीचे सर्व नेते दोन दिवसांत सर्वमान्य असे नाव निश्चित करतील. ते नाव डोंगळे यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीदेखील पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

कौलव जि.प. मतदारसंघ डोंगळेंना सोडणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गोकुळबाबत विषय काढला तर त्यांनाही आपण वस्तुस्थिती समजावून सांगू. यासंदर्भात अद्याप त्यांच्याशी आपले कोणतेही बोलणे झालेले नाही, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, डोंगळे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आम्ही त्यांना कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्याचे मान्य केले आहे. हे करत असताना पालकमंत्री आबिटकर यांच्यासह संबंधित तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे. वेळ आल्यानंतर आम्ही चर्चा करू, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news