Gokul Chairman Election | गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी समन्वयाच्या झाल्या घोषणा; चर्चेसाठी मात्र हात मागे

समविचारी-महायुतीमध्ये चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता धूसर
Gokul Chairman Election
Gokul Chairman ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

धीरज बरगे

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडण्यासाठी दोन्ही बाजूंकडून समन्वयाची भाषा केली जात असली, तरी प्रत्यक्ष चर्चेसाठी कोणताही नेता पुढाकार घेताना दिसत नाही. एकीकडे समन्वयातून मार्ग काढण्याच्या घोषणा होत असताना दुसरीकडे एकमेकांशी संवाद साधण्याची तयारीही दिसत नसल्याने ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीचा तिढा गुंतागुंतीचा बनत आहे. समविचारी आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांमध्ये चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता सध्यातरी धूसर झाली असून, नेत्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत बहुमत मिळविले, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. संख्याबळाच्या या कौलानंतर अध्यक्षपदाची निवडणूक सहज पार पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या कोरमच्‍या पेचामुळे ही निवडणूक रखडली. पहिल्या बैठकीत आवश्यक कोरमअभावी अध्यक्ष निवड होऊ शकली नाही. त्यानंतर न्यायालयीन हस्तक्षेपातून १० नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीची बैठक घेण्याचा मार्ग मोकळा झाला. बैठकीची तारीख निश्‍चित झाली असली, तरी अध्यक्ष निवडीचा मार्ग अद्याप सुकर झालेला नाही.

समन्वयाची भाषा; पण प्रत्यक्ष संवाद कुठे?

‘गोकुळ’मधील सत्तासंघर्ष संपविण्यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्‍ही आघाडीच्‍या नेत्‍यांनी एकत्र चर्चा करून अध्‍यक्ष निवडीचा प्रश्‍न मार्गी लावावा, असे आवाहन केले. समविचारीचे आ. सतेज पाटील यांनी सुरुवातीला महायुती नेत्‍यांशी फोनवरून संपर्क साधत अध्‍यक्ष निवडीसाठी सहकार्य करण्‍याची विनंती केली. मात्र, यावर महायुतीचे समाधान झालेले नसून नेत्‍यांना अध्‍यक्ष निवडीमध्‍ये तडजोडीची अपेक्षा आहे. तर आ. सतेज पाटील यांची बहुमत मिळाल्‍याने समविचारीचा अध्‍यक्ष झाला पाहिजे, अशी भूमिका आहे. त्यामुळे समन्‍वयासाठी आवश्यक असलेली प्रत्यक्ष बैठक, मध्यस्थी, एकमेकांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया अद्याप पुढे आलेली नाही. त्‍यामुळे अध्‍यक्ष निवडीचा तिढा कायम आहे.

‘गोकुळ’ निवडणूक ते मंगळवारी होणारी अध्‍यक्ष निवड याबाबतचा घटनाक्रम असा

१८ ऑक्‍टोबर : गोकुळसाठी ९९.९६ टक्‍के मतदान

१९ ऑक्‍टोबर : मतमोजणीमध्‍ये २५ पैकी १३ जागांवर समविचारीला बहुमत

२३ ते २८ ऑक्‍टोबर : अध्‍यक्षपदासाठी राजकीय हालचाली, समविचारीकडून शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव निश्‍चित

२९ ऑक्‍टोबर : महायुतीचे संचालक अनुपस्‍थित राहिल्‍याने पहिली अध्‍यक्ष निवड सभा कोरमअभावी तहकूब. समविचारीकडून समांतर सभा. शशिकांत पाटील-चुयेकर यांची बहुमताने अध्‍यक्षपदी निवड.

३० ऑक्‍टोबर : बहुमताच्‍या संख्‍येवर चुयेकर यांची अध्‍यक्षपदी केलेली निवड वैध ठरविण्‍यासाठी समविचारी आघाडीची कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये धाव.

२ नोव्‍हेंबर : कोल्‍हापूर सर्किट बेंचमध्‍ये झालेल्‍या सुनावणीत न्‍यायालयाचे १० नोव्‍हेंबरला अध्‍यक्ष निवड सभा घेण्‍याचे निर्देश, निवडून आलेल्‍या २५ संचालकांनाच नोटीस देण्‍याचे आदेश.

४ नोव्‍हेंबर : मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत शासननियुक्‍त संचालकांची नियुक्‍ती करून त्‍यांना मतदानाचा अधिकार देण्‍याचा निर्णय.

५ नाव्‍हेंबर : मंत्रिमंडळाच्‍या या निर्णयाविरोधात समविचारीकडून संघर्ष मोर्चाची हाक.

६ नोव्‍हेंबर : राज्‍यपालांची अध्‍यादेशावर स्‍वाक्षरी, शासननियुक्‍त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्‍याचा मार्ग मोकळा

७ नोव्‍हेंबर : शासन नियुक्‍त संचालकांची संभाव्‍य नावे चर्चेत.

९ नोव्‍हेंबर : दसरा चौक येथून निघणार संघर्ष मोर्चा. मोर्चाद्वारे दूध उत्‍पादकांची जिल्‍हाधिकारी कार्यालयावर धडक गोकुळ अध्‍यक्ष निवडीसाठी निर्णायक दिवस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.