Gokul Dairy | पशुखाद्य अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; गोकुळ संचालक मंडळाचा निर्णय

पहिली बैठक खेळीमेळीत
कोल्हापूर : गोकुळ मुख्‍यालयातील पहिल्या बैठकीस उपस्थित सर्व संचालक आणि अधिकारी.
कोल्हापूर : गोकुळ मुख्‍यालयातील पहिल्या बैठकीस उपस्थित सर्व संचालक आणि अधिकारी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : दुष्‍काळामुळे केंद्र, राज्य शासनाकडून वैरण, पशुखाद्यासाठी अनुदान मिळविण्यासाठी संचालक मंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्‍यासंबंधीचा निर्णय गोकुळच्या पहिल्या बैठकीत घेण्‍यात आला. दूध उत्पादकांच्या हिताच्या शासकीय योजना गोकुळच्या सहकार्याने राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

अध्यक्ष राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या प्रधान कार्यालयात ही बैठक झाली. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, गोकुळच्या प्रगतीसाठी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल. दूध उत्पादकांचे हित जपत सर्वांच्या सहकार्याने संघाची वाटचाल पुढे नेली जाईल.

बैठकीत संघाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दूध संकलन व विक्रीतील घट-वाढ, उत्पादन खर्च आणि आगामी नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाबाबतही विचारविनिमय करण्यात आला. सभेसाठी आवश्यक पूर्वतयारी आणि त्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन पुढील महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

पशुखाद्य निर्मिती तसेच दुग्ध प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरातील वाढ आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाचा गेल्या सहा महिन्यांत संघाच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या परिणामाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात कच्च्या मालाची संभाव्य कमतरता, आवश्यक आर्थिक तरतूद आणि खर्चाचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याचेही सर्वानुमते ठरविण्यात आले.

यावेळी संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, विरेंद्र मंडलिक, राहुल पाटील, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, अजित नरके, किसन चौगले, मदन देसाई, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब चौगले, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, विश्वजित जाधव, राजुबाबा आवळे, शशिकांत खोत, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, शासननियुक्त संचालक शिवाजी आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, ॲड. प्रशांत पाटोळे, कृष्णात पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.