

गुडाळ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ तथा गोकुळ च्या १२०० संस्था अवसायनात काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी निकाल अपेक्षित आहे. या सर्व संस्थांची सुनावणी घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे आदेश सर्किट बेंचकडून सहाय्यक निबंधक (दुग्ध ) यांना दिले जातील असे सहकारातील तज्ञांचे मत आहे.
दरम्यान, १२०० संस्था अपात्र ठरविण्याबाबतचा चेंडू सहाय्यक निबंध कार्यालयाकडे आल्यास ही प्रक्रिया महिनाभर चालणार असल्याने साहजिकच गोकुळची निवडणूक पावसाळ्याच्या पुढे जाणार असल्याची शक्यता आहे . 11 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात ना. मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका निकालात काढताना न्यायालयाने ना. मुश्रीफ यांनी मांडलेल्या अंतरिम आदेशाबाबतचा मुद्दा न्यायालयाने सुनावणीवेळी ऐकून घ्यावा अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती.
त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीत उच्च न्यायालय संबंधित संस्थांचे म्हणणे ऐकून सहाय्यक निबंधकांना उचित आदेश देतील असे सहकारातील तज्ञांचे मत आहे. एकंदरीत गोकुळची निवडणूक वेळेत होणार की लांबणीवर पडणार याचा फैसलाच मंगळवारी होणार असल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष उच्च न्यायालयातील कोल्हापूर सर्किट बेंचच्या मंगळवारच्या सुनावणीकडे लागले आहे.