

कोल्हापूर : गोव्यातील नाईट क्लबला आग लागली आणि ही बातमी समजताच कोल्हापूरकरांचीही घालमेल सुरू झाली. अनेकांनी गोव्यात गेलेल्या नातेवाईक, मित्रमंडळींना फोनाफोनी सुरू केली. माहिती घेतली गेली. या भीषण दुर्घटनेत गेलेल्या निष्पाप बळींसाठी कोल्हापूरकरांचेही मन हळहळले. पण आपले कोणी त्यात नव्हते, हे स्पष्ट झाले आणि कोल्हापूरकरांचा जीव भांड्यात पडला.
कोल्हापूर आणि गोवा असे वेगळेच नाते आहे. देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळापैकी एक असलेला गोवा आणि कोल्हापूर यांच्यातील अंतर हे अवघे चार ते पाच तासांचे आहे. प्रवासाचा कमी कालावधी आणि आबालवृद्धांना, त्यांच्या त्यांच्या स्टाईलने सुट्टी एन्जॉय करण्यासाठी कोल्हापूरकरांचे गोवा हे प्रमुख डेस्टिनेशन आहे. यामुळे वाढदिवसाची पार्टी जरी करायची म्हटले, तरी अनेकजण गोव्याची वाट धरतात. यामुळे शनिवार-रविवारी गोवा गाठणार्या कोल्हापूरकरांची संख्या प्रचंड आहे.
गोव्यातील क्लब, कॅसिनोचे आकर्षक अनेक कोल्हापूरकरांना आहे. अगदी काही वेळा भाड्याने गाडी घेऊन कॅसिनोत जाणे, दोन-तीन दिवस तिथे खेळून परत येणे असे अनेकांचे उद्योग सुरू असतात. क्लब, कॅसिनोसाठी जाणारे तासन्तास क्लब आणि कॅसिनोतच असतात. यासह मित्र, नातेवाईकांबरोबर एन्जॉय करण्यासाठी, कधी ट्रिप म्हणून तर कधी सेलिब—ेशन म्हणून अनेकजणांची गोव्यालाच पसंती असते. यासह व्यापार, व्यवसाय तसेच कामानिमित्तही अनेकजण गोव्यात आहेत, त्यांचेही जाणे-येणे सुरू असते. कोल्हापुरातून गोव्यासाठी दिवसभरात एसटी महामंडळाच्या आणि खासगी अशा 50 हून अधिक बसेस आहेत. यासह खासगी वाहनांने जाणार्यांची संख्याही लक्षणीय आहे. यामुळे गोव्याला कोल्हापुरातून जाणार्यांची दररोजची संख्या हजारांवर असते.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोव्यातील क्लबमध्ये भीषण अग्नितांडव झाले. त्यात 25 जणांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही बातमी कोल्हापुरात समजताच गोव्याला गेलेल्या आप्तजणांच्या चौकशीसाठी फोनाफोनी सुरू झाली होती. काहींचे फोन लागत होते, काही जण फोन उचलत नव्हते तर काहीजणांचे फोनच लागत नव्हते. आप्तजणांशी संपर्क होत नाही, ते सुरक्षित आहेत हे कानी पडत नाहीत तोपर्यंत प्रत्येकाची घालमेल सुरू होती. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावेही समजत नव्हती, त्यामुळे शंका-कुशंका वाढतच चालल्या होत्या. दुपारपर्यंत मृत आणि जखमींची ओळख जवळपास स्पष्ट झाली, गोव्याला गेलेल्यांचेही संपर्क झाले यामुळे कोल्हापूरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सकाळी दहा वाजता संपर्क झाला अन् जीव भांड्यात पडला
पतीचा खासगी चारचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. कोल्हापुरातील काही व्यावसायिक कॅसिनोसाठी आमची कार भाड्याने घेऊन जातात. शुक्रवारी रात्री पती त्यांना घेऊन गेले होते. आगीची घटना सकाळी नऊच्या सुमारास समजली. त्यानंतर तत्काळ त्यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तो होत नव्हता, यामुळे चेहर्यावरचा तणाव वाढतच चालला होता. त्यावेळी सकाळी दहाच्या सुमारास पतीचाच फोन आला. त्यांना या घटनेची कल्पना नव्हती. पण आमचा जीव मात्र टांगणीला लागला होता. पती सुखरूप असल्याचे कळताच जीव भांड्यात पडल्याचे एका महिलेने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.