

कोल्हापूर : आलिशान मोटारीतून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणाऱ्या एकास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन लाखांचे मद्य, एक आलिशान मोटार असा सुमारे २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
उमेश महादेव घाटगे (वय ४४, रा. नरघोल वस्ती, कवठेमहांकाळ, सांगली) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी कोल्हापूर- सांगली मार्गावर हातकणंगलेनजीक ही कारवाई केली. गोवा बनावटीच्या मद्याची आलिशान मोटारीतून तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली होती. यानुसार या पथकाने कोल्हापूर - सांगली मार्गावर हातकणंगलेनजीक सापळा रचून एक मोटार ताब्यात घेतली.
मोटारीच्या डिक्कीमध्ये मद्याचे १० बॉक्स आढळून आले. चालक उमेश घाटगे याला ताब्यात घेतले असता, कवठेमहांकाळ परिसरात विक्रीसाठी हे मद्य नेत असल्याची माहिती समोर आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे, एस. पी. डोईफोडे, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, विशाल आळतेकर, राहुल कुटे यांनी ही कारवाई केली.