

कासारवाडी : नेहमीप्रमाणेच शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वाहनचालक पन्हाळा तालुक्यातील गिरोली येथून जाखलेमार्गे कोडोली, वारणानगर असा प्रवास करत होते. प्रत्येक जण आपापल्या घाई गडबडीत घाट रस्त्यावरून जात होते. गिरोलीच्या खाली सुमारे दीड किलोमीटर अंतरावर घाटात रस्त्यावर गवा उभा होता. गव्याला पाहताच अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांना ब—ेक लागले. गव्याला पाहताच वाहन चालकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
गव्याला पाहताच आता मागे फिरावे की पुढे जावे, हे वाहनचालकांना सुचेना. दुचाकीवर महिला व लहान मुले होती. वेळ जाईल तशी वाहने मागे आणि पुढे अधिकच वाढू लागली. दुसरीकडे गव्याची अवस्था अशीच झाली. गव्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर वाहने लागली होती. गव्याच्या समोर अनेक वाहने उभी होती. मागील बाजूसही अनेक वाहने थांबली होती. जसजशी वाहनांची गर्दी अधिकच वाढू लागली. तसा गवा जंगलात शिरण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु त्याला जंगलात जाण्यासाठी रस्ताच नव्हता. समोर वाहने उभी होती. पाठीमागे वाहने लागली होती. घाटातील अरुंद रस्ता.... एका बाजूला उंच डोंगर ज्यावर गवा चढू शकत नव्हता, तर दुसर्या बाजूला रस्त्याचा संरक्षणाचा बांधलेला कठडा व त्याच्याखाली दरीसारखा सरळ उतार यामुळे गवा दोन्ही बाजूला जाऊ शकत नव्हता....तसे थांबलेल्या वाहन चालकांनी आपला श्वास रोखला. गवा आपल्या बाजूने आला, तर... या भीतीने अनेकांनी आपली वाहने पाठीमागील बाजूस वळवण्याचा प्रयत्न केला.
पण, घाटात वाहनेे वळवणे अवघड झाले. अनेकांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूला लावून परिसरातील जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. गव्यानेही गिरोलीच्या दिशेने रस्त्याच्या बाजूने धावत येऊन झाडीत गायब झाला... मग सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.