

हातकणंगले/रुकडी : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील हॉटेल सागरिका या लॉजिंगवर आर्थिक वादातून प्रेयसीचा हातोडीचे घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. सौ. सुमन सुरेश सरगर (वय 35, मूळ गाव जत, जि. सांगली, सध्या उचगाव) असे तिचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी प्रियकर आदम गौस पठाण (रा. घुणकी, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेतले आहे.
एका कार्यक्रमादरम्यान सुमन सरगर व आदम पठाण यांची ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. याचाच फायदा घेऊन पठाण याने त्या महिलेकडून सात लाख रुपये घेतले होते. सुमन सरगर त्या पैशाची वारंवार मागणी करत होती. रक्कम देणे शक्य नसल्याचे पठाण याने सरगर हिचा काटा काढण्याचे ठरविले. त्याने अतिग्रे येथील सागरिका लॉजवर नेऊन तिच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून खून केला. दरम्यान, पठाण हा सुसाईड नोट लिहून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असताना हॉटेल कर्मचार्यांच्या लक्षात आले. त्यांनी संशयिताला पकडून पोलिसांना कळविले. पोलिसांना त्याला ताब्यात घेतले आहे. जयसिंगपूर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक रोहिणी साळुंके व हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड व पोलिसपाटील रूपाली पाटील, रुकडीचे माजी उपसरपंच शीतल खोत यांनी पोलिसांना तपास कार्यात सहकार्य केले.