Ghons snake | कृष्णा-वारणाकाठी विषारी घोणसचा विळखा!

Ghons snake
Ghons snake | कृष्णा-वारणाकाठी विषारी घोणसचा विळखा!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : कृष्णा-वारणा नदीकाठच्या बागायती क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत जहाल विषारी असलेल्या घोणस या सापांचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह शेतमजुरांमध्येही घोणसची दहशत पसरलेली दिसत आहे.

पूर्वी या भागात घोणस जातीचे साप अत्यंत अपवादाने आढळून येत होते. पण मागील पाच-दहा वर्षांत वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या महापुरांमुळे प्रामुख्याने सह्याद्रीच्या जंगल भागातून पुराच्या पाण्याबरोबर हे साप या भागात आलेले दिसतात. या भागात मोठ्या प्रमाणात बारमाही बागायती शेती असल्याने घोणस प्रजातीच्या वाढीच्या दष्टीने सगळे अनुकूल वातावरण आहे. हा साप एकाचवेळी 30 ते 40 पिलांना थेट जन्म देत असल्यामुळे या भागात घोणस प्रजातीची अफाट पैदास झालेली दिसते आहे.

प्रमुख आश्रयस्थान!

ऊस, केळी आणि हळदीसारख्या पिकांना वर्षभर सातत्याने पाणी द्यावे लागत असल्याने अशा जमिनींमध्ये वर्षभर गारवा असतो. त्यामुळे ही पिके घोणससाठी जणू काही हक्काची आश्रयस्थाने बनून गेली आहेत. अशी पिके असलेल्या एकरभर शिवारात किमान दहा-वीस घोणस तरी अगदी हमखास आढळून येतात. पूर्वी या भागात घोणसची ओळखसुद्धा नव्हती, पण गेल्या काही वर्षांत या भागातील घोणसच्या अफाट पैदाशीमुळे आणि त्यांच्या सततच्या दिसण्यामुळे आजकाल हा साप सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे. अनेकवेळा शेतालगतच्या झाडांवरही घोणसने घरोबा केलेला बघायला मिळत आहे.

धास्तीचे वातावरण!

अत्यंत जहाल विषारी असल्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये तर घोणसची विशेष धास्ती फैलावलेली दिसते. ऊस, केळी आणि हळदीसारख्या पिकांमध्ये वावरताना शेतकरी गमबूट आणि लांबलचक रबरी हातमोजे असल्याशिवाय जाऊ शकत नाहीत, अशी अवस्था आहे. शेतमजूर तर अशा पिकांमध्ये मजुरी करायलाही कचरत आहेत. त्यामुळे ऊस, केळी आणि हळदीसारख्या पिकांमध्ये काम करणार्‍या मजुरांसाठी शेतकर्‍यांना नेहमीपेक्षा जादा मजुरी मोजण्याची वेळ आली आहे.

सर्पमित्रांमध्येही दहशत!

या भागात अनेक तरुण सर्पमित्र म्हणून काम करतात. पण इतर साप पकडणे आणि घोणस पकडणे यात फार फरक असल्याचा त्यांचा अनुभव आहे. नाग हा विषारी सापांमध्ये अत्यंत चपळ समजला जातो. पण सर्पमित्र अगदी सहजासहजी नाग पकडतात. पण सर्पमित्रांच्या मते घोणस पकडणे हे अत्यंत धोकादायक आहे. कारण घोणस अक्षरश: विजेच्या वेगाने हल्ला करतो. शिवाय तो कधी कुठल्या बाजूने गिरकी घेऊन हल्ला करेल, याचा अंदाज येत नाही. सांगली जिल्ह्यात एक-दोन सर्पमित्रांचा घोणस पकडताना दंश होऊन मृत्यू झाल्याची अगदी अलीकडील उदाहरणे आहेत. त्यामुळे सर्पमित्रही घोणस पकडत नाहीत.

कीटकनाशकेही निष्प्रभ!

शेतात आढळणार्‍या विषारी सापांचा बंदोबस्त करण्यासाठी काही शेतकरी जहाल विषारी कीटकनाशके फवारतात. परिणामी गेल्या काही वर्षांत या भागातील सापांचे अस्तित्व जवळ जवळ संपुष्टात आले आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी घोणसवरही हा प्रयोग केला. पण कोणत्याही कीटकनाशकाला घोणस दाद देत नसल्याचे दिसले. परिणामी घोणसने कृष्णा-वारणा काठावरील शेतकर्‍यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केलेली आढळून येत आहे.

विविध प्रकारच्या घोणसचा राबता..!

प्रामुख्याने दक्षिण भारत व सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आढळून येणारे घोणसचे सर्व प्रकार आजकाल या भागात दिसून येऊ लागले आहे. पिवळसर, काळसर, हिरवट रंगाचे हे घोणस आहेत. अगदी दोन फुटापासून पाच-सहा फूट लांबीचेही घोणस आढळून येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news