HIV Prevention| एचआयव्ही प्रतिबंधक जेनेरिक औषध १२० देशांत उपलब्‍ध होणार

सहा महिन्यांतून एकदा घ्याव्या लागणार्‍या इंजेक्शनच्या जेनेरिकला ‘यूएसएफडीए’ची मंजुरी
HIV Prevention
एचआयव्ही प्रतिबंधक जेनेरिक औषध १२० देशांत उपलब्‍ध होणार
Published on: 
Updated on: 

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : एचआयव्ही संसर्ग रोखण्याच्या जागतिक प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने विकसित केलेल्या सहा महिन्यांतून एकदा घ्याव्या लागणार्‍या प्रतिबंधात्मक इंजेक्शनच्या जेनेरिक आवृत्तीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) मंजुरी दिली आहे. जगातील एकमेव वर्षातून दोनदा दिले जाणारे एचआयव्ही प्रतिबंधक औषध स्वस्त झाल्‍यामुळे १२० कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये उपचार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘लेनकॅपाव्हीर’ या औषधाची जेनेरिक आवृत्ती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने विकसित केली आहे. ‘युनिटेड’, ‘क्लिटंन हेल्थ अ‍ॅक्सेस इनिशिएटिव्ह’ आणि आफ्रिकेतील आरोग्य संशोधन संस्था ‘विटस्‌ आरएचआय’ यांच्या सहकार्याने या औषधाच्या विकासाला गती देण्यात आली. या औषधाची किंमत संबंधित देशांमध्ये प्रति व्यक्ती वर्षाला सुमारे ४० डॉलर (३५०० ते ३६०० रुपये) अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, सध्या उपलब्ध असलेल्या दररोज घ्याव्या लागणार्‍या एचआयव्ही प्रतिबंधक गोळ्यांच्या वार्षिक खर्चाइतकीच ही किंमत आहे.

या औषधाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज गोळ्या घेण्याऐवजी सहा महिन्यांतून एकदाच इंजेक्शन घ्यावे लागते. त्यामुळे उपचारांमधील अनियमितता कमी होण्यास मदत होणार आहे. एचआयव्ही संसर्गाचा धोका अधिक असलेल्या व्यक्तींवर झालेल्या दोन महत्त्वपूर्ण वैद्यकीय अभ्यासांमध्ये या इंजेक्शनमुळे नवीन संसर्गाचे प्रमाण जवळपास शून्यावर आणण्यात यश आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जगभरात सुमारे ४ कोटी १० लाख रुग्ण एचआयव्हीसह जीवन जगत होते; तर या संसर्गाशी संबंधित कारणांमुळे ५.७ लाख रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक स्तरावर एचआयव्ही प्रतिबंधासाठी ‘प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस’ (पीआरईपी) उपचारांची आवश्यकता असलेल्या सुमारे दोन कोटी लोकांपर्यंत हे औषध पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

‘पीआरईपी’ म्हणजे संसर्गाचा धोका असलेल्या व्यक्तींनी विषाणूच्या संपर्कात येण्यापूर्वी घ्यावयाचे प्रतिबंधात्मक औषध. आतापर्यंत या औषधाचा पुरवठा गिलियड सायन्सेस या अमेरिकी कंपनीकडून होत होता. कंपनीच्या मूळ औषधाला ‘येझ्टुगो’ या ब्रँडने अमेरिकेत मंजुरी मिळाली असून, त्याची वार्षिक सूचिबद्ध किंमत २८.२१८ डॉलर आहे. पेटंट संरक्षणामुळे डॉ. रेड्डीजच्या जेनेरिक औषधाची अमेरिकेत विक्री करता येणार नाही. ‘यूएसएफडीए’ने दिलेली मंजुरी तात्पुरत्या स्वरूपाची असून मूळ औषधाचे पेटंट कायम असताना जेनेरिक औषधाची गुणवत्ता आणि सुरक्षितता प्रमाणित करण्याची ही प्रक्रिया आहे. या मंजुरीमुळे अन्य देशांतील नियामक मान्यतांची प्रक्रिया वेगवान होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.