कोल्हापूर-सांगलीसह सहा ठिकाणी रत्न, आभूषण क्लस्टर्स

महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण जाहीर
Gems-And-Jewellery-Clusters-Announced-In-Six-Maharashtra-Locations-Including-Kolhapur-Sangli
कोल्हापूर-सांगलीसह सहा ठिकाणी रत्न, आभूषण क्लस्टर्स
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : कोल्हापूरचा ‘साज’ हा केवळ दागिना नाही, तर पारंपरिक कौशल्य आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. अस्सल कोल्हापुरी दागिन्यांना आणि पारंपरिक डिझाईन्सना आधुनिक उत्पादन, जीआय मानांकन आणि निर्यात साखळीशी जोडण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तयार करण्यात येणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत कोल्हापूर-सांगलीसह नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या ठिकाणी क्लस्टर्स उभारले जाणार आहेत. यामुळे पारंपरिक सोनार कारागिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागाला आता अत्याधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाशी जुळण्यास मदत होईल.

या धोरणात क्लस्टर विकासासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय योजनांचा समन्वय साधून एक संरचित औद्योगिक आराखडा आखण्यात आला आहे. पायाभूत सुविधा सुधारणा, तंत्रज्ञानातील प्रगती आणि सहयोगी व्यवसाय प्रणाली या तीन दिशांनी क्लस्टर्स विकसित करण्यात येतील. या माध्यमातून उद्योगातील तफावत दूर करून पारंपरिक कारागिरांना औपचारिक व्यवसाय चौकटीत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कोल्हापूर, सांगली क्लस्टरमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी) उभारले जाईल. हे केंद्र हॉलमार्किंग, चाचणी प्रयोगशाळा, सुरक्षित व्हॉल्टिंग व्यवस्था आणि डिजिटल विक्री साहाय्य अशा सेवा देईल. या सुविधा उद्योगांना आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांशी सुसंगत काम करण्यास सक्षम करतील. ‘सीएफसी’मध्ये स्थानिक सोनार आणि लघू उद्योगांना त्यांच्या उत्पादनाची चाचणी, प्रमाणीकरण आणि निर्यात तयारीसाठी आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील.

या धोरणाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे डिझाईन स्टुडिओंची स्थापना. या स्टुडिओंमुळे कारागीर, स्वतंत्र डिझायनर आणि लघू-मध्यम उद्योजकांना उच्च दर्जाची डिझाईन संसाधने आणि नवोपक्रमक्षम जागा मिळेल. पूर्वी महाग असलेल्या तंत्रज्ञान, सीएडी मॉडेलिंग आणि 3-डी प्रिंटिंग साधनांचा वापर आता राज्यपुरस्कृत स्टुडिओंमधून करता येणार आहे. या स्टुडिओंमुळे स्थानिक कारागिरांची सर्जनशीलता आणि डिझाईन क्षमता वाढेल, तसेच महिला उद्योजिका व नव्या पिढीतील डिझायनर्सना देश-विदेशातील बाजारपेठेत स्पर्धा करता येईल.

‘कोल्हापुरी साज’ला नवे औद्योगिक अधिष्ठान

कोल्हापूरचा ‘साज’ हा केवळ दागिना नाही, तर पारंपरिक कौशल्य आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या क्लस्टर विकास योजनेमुळे ‘कोल्हापुरी साज’ आणि अशा पारंपरिक डिझाईन्सना आधुनिक उत्पादन, प्रमाणीकरण आणि निर्यात साखळीशी जोडले जाईल. राज्य शासनाच्या जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) आणि हेरिटेज ब्रँडिंग धोरणाशी हे थेट संलग्न असल्याने, कोल्हापूरच्या कारागिरांना अधिकृत जीआय ब्रँडअंतर्गत काम करण्याची संधी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news