

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवर गंगाई लॉनजवळ टोळीयुद्धातून झालेल्या महेश राजेंद्र राख याच्या खूनप्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केलेल्या गवळी टोळीचा म्होरक्या आदित्य शशिकांत गवळी याच्यासह तिघा मारेकर्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. रक्ताच्या चिळकांड्या उडालेले मारेकर्यांच्या अंगावरील कपडेही जप्त करण्यात आले आहेत.
मुख्य संशयित सिद्धांत गवळी, ऋषभ साळोखे-मगर यांच्यासह टोळीतील अन्य संशयित अद्याप पसार आहेत. संयुक्त पथकाच्या वतीने मारेकर्यांचा शोध घेण्यात येत आहे. खूनप्रकरणी अटक केलेल्या आदित्य गवळी, सद्दाम कुंडले, धीरज शर्मा याना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. अटक केलेल्या मारेकर्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. खुनाच्या गुन्ह्यात मारेकर्यांनी धारदार शस्त्रांचा वापर केला आहे. हल्ल्यावेळी रक्ताने माखलेले कपडे मारेकर्यांकडून जप्त करायचे आहेत.
सायंकाळी चार मारेकर्यांकडून रक्ताचे डाग असलेले कपडे हस्तगत करण्यात आले. खुनात वापरलेल्या शस्त्राबाबत संशयित वेगवेगळी माहिती देत आहेत. गुन्ह्यातील काही शस्त्रे महामार्गावरील पंचगंगा पुलाजवळ शेतवडीत फेकून दिल्याची माहिती आहे. सायंकाळी पथकाने संबंधित परिसरात शस्त्रांचा शोध घेतला. मुख्य फरार संशयित सिद्धांत गवळी हाताला लागल्यानंतर काही बाबींचा उलगडा शक्य असल्याचे सहायक निरीक्षक सरवदे यांनी सांगितले.