

कोपार्डे : कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर कोपार्डे (ता. करवीर) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बाबू नाऊ कात्रट (वय 42, रा. भेंडाईचा धनगरवाडा, ता. पन्हाळा) या गवंडी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. कामावरून घराकडे परतताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाचा शोध घेत आहेत.
कात्रट हे गवंडी कामावर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काम आटोपून मोटारसायकल (एमएच 09 डीटी 4614) वरून रात्री घरी परतत असताना कोपार्डे हद्दीतील गणेश नाळवा येथे अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ते रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली; परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुले व मुलगी, लहान भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्याने या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला असून, घटनास्थळी कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.