

बाजारभोगाव : किसरूळ (ता. पन्हाळा) येथील खापर मळा व विठ्ठल मळा परिसरात पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणार्या गव्याला अखेर वन विभागाने पकडून चांदोली अभयारण्यात सुरक्षित सोडलेे. या गव्याच्या हल्ल्यात बंडा पांडू खोत (वय 82) या शेतकर्याचा मृत्यू झाला होता.
शनिवारी घटनास्थळी पंचनामा सुरू असताना हल्लेखोर गवा तेथेच आढळून आला. यावेळी त्याने उपस्थितांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र वन कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. त्यानंतर वन विभागाने विशेष मोहीम राबवली. दिवसभर ड्रोन कॅमेर्याच्या सहाय्याने गव्याचा माग काढत त्याला शेताबाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला हालचाल करताना अडचणी येत होत्या. अखेर भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध करण्यात आले. मातीचा रॅम्प तयार करून शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ट्रॅक्टरमधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या विशेष वाहनातून चांदोली अभयारण्यात सोडले.